– मानसी जोशी

मुंबईत ठिकठिकाणी रंगणारा नवरात्रोत्सव, गरबा यंदा करोनाच्या सावटाखाली आल्याने चणिया चोली-दागदागिने, दांडिया, गरबा क्लासचालक असे अर्थचक्र ही बाधित झाले आहे.

मुंबईतील गोरेगाव, मालाड, अंधेरी, मुलुंड, बोरिवली या गुजरातीबहुल भागांत नवरात्रीचे नऊ दिवस गरबा, दांडिया, स्पर्धा, गायन, नृत्य असे कार्यक्र म रंगतात. खास गरब्याकरिता चणिया चोली, त्याला अनुरूप दागदागिने यांना बाजारात मोठी मागणी असते. गरबा क्लासेसनाही या काळात भरपूर मागणी असते. यंदा करोनामुळे गरबाच रंगणार नसल्याने हे सगळेच अर्थकारण थांबले आहे.

ठाण्यातील ‘ड्रेस फॉर लेस’ दुकानात चणिया चोली, घागरा, जॅकेट भाड्याने दिली जातात. ‘दरवर्षी नवरात्रीच्या एका महिना आधीपासून ग्राहक आमच्याकडे विचारणा करतात. या नऊ दिवसांत ५० ते ६० ग्राहक भाड्याने ड्रेस घेतात. वर्षाच्या सुरुवातीला तयार के लेले कपडे तसेच पडून आहेत. शाळेचे कार्यक्रम, सण समारंभ होत नसल्याने भाड्याने कपडे घ्यायचे प्रमाण कमी आहे,’ असे दुकान मालक कोमल डुटिया यांनी सांगितले.

मालाड येथील केतन शाह सुरत, अहमदाबाद, येथून चणिया चोली, घागरा, पुरुषांसाठी धोती आणून त्याची विक्री करतात. यंदा मागणीच नसल्याने व्यवसाय ठप्प आहे. जानेवारीला चार लाख रुपये किमतीचा माल भरला होता. टाळेबंदीमुळे दुकान पाच महिने बंद असल्याने कपड्यांना बुरशी लागली आहे. आता तो माल कसा संपवायचा हा प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले.दादर येथील राजू बावा या टॅटू कलाकाराला नवरात्रीत चांगली मागणी असते. परंतु, तरुणतरुणी टॅटू काढून घेतात. याशिवाय विविध मंडळांकडूनही टॅटू काढण्यासाठी बोलावले जाते. या कालावधीत पंधरा ते वीस हजार रुपयांची सहज कमाई होते. परंतु, करोनामुळे उत्पन्नावर पाणी फिरल्याचे ते सांगतात.

या नऊ दिवसांत रंगीबेरंगी गोंडे लावलेले, लाकू ड, बांबू, प्लास्टिक यांपासून बनवलेल्या विविध प्रकारच्या दांडियांना ग्राहकांकडून मागणी असते. मुंबईतील क्रॉफर्ड, भुलेश्वार आणि नळबाजार या ठिकाणी अशा प्रकारची दांडियांची विक्री करणारे घाऊक विक्रेते आहेत. गरबाच रंगणार नसल्याने छोट्या-मोठ्या किरकोळ विक्रेत्यांनीही हात आखडता घेतला आहे.

नृत्य शिकवणी वर्गांना थंड प्रतिसाद

नवरात्रीत दोन टाळ्यांचा पारंपरिक गरबा शिकवणाऱ्या नृत्य वर्गांना उत्तम प्रतिसाद मिळतो. सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या वर्गांत दोन टाळी, प्रोग्रेसिव्ह आणि पारंपरिक अशा तीन टप्प्यांत गरबा शिकवला जातो. यात  हिंदी चित्रपट आणि गुजराती भाषेतील गाण्यावर नृत्य शिकवले जाते. तरुणांसोबत ज्येष्ठ नागरिकही नृत्याचे धडे घेतात. या वर्षी राज्य सरकारने गरबा आयोजित करण्याला मनाई केल्याने आम्ही गरबा नृत्याचे शिकवणी वर्ग घेत नसल्याचे ‘डान्स फॉर लाइफ’च्या प्रमुख रिना जांगियानी यांनी सांगितले.