देशाच्या संरक्षण दलात नौदलाचे असलेले महत्व आणि नौदलातील संधी व करिअरविषयी शालेय विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, नौदलात सहभागी होण्याविषयी त्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने नौदलातील काही अधिकाऱ्यांनी एक आगळी मोहीम सुरू केली आहे.
नौदलातील पंधरा जणांचा हा चमू शिवाजी महाराजांच्या २३ किल्ल्यांना भेट देणार आहे. २३ मार्चपासून मुंबईजवळील माहुली किल्ल्यापासून या मोहिमेला सुरुवात झाली आहे. मोटारसायकलवरून त्यांचा हा प्रवास सुरू असून किल्ल्यांच्या भेटीबरोबरच ते किल्ल्याच्या परिसरातील असलेल्या गावातील शाळांमधून व्याख्याने देत आहेत. नौदलाविषयी ध्वनिचित्रफितीही विद्यार्थ्यांना दाखविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये विशेषत: इयत्ता ७ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांमध्ये भारतीय नौदल म्हणजे काय, त्याचे काम कसे चालते, नौदलातील नोकरीच्या संधी या सगळ्याची माहिती त्यांना दिली जात आहे. भारतीय नौदलाच्या विविध विभागांमधील १५ जण या मोहिमेत सहभागी झाले आहेत. मोहिमेत शिवनेरी, प्रबळगड, माणिकगड, कर्नाळा, तुंग, लोहगड, विसापूर, सिंहगड, पुरंदर, रोहिडा या आणि अन्य किल्ल्यांना आम्ही भेट देणार आहोत, मोहिमेची सांगता २२ एप्रिल रोजी रायगडावर होणार आहे, अशी माहिती या मोहिमेचे नेतृत्व करणारे लेफ्टनंट संकेत कदम यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. मोहमेत सहभागी झालेले सर्व जण मुंबईतील आहेत.