”कुणीही कितीही टरटर केली तरी आकाश काही फाटणार नाही आणि पाऊस काही पडणार नाही” अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपा नेत्यांना टोला लगावला आहे.

दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणानंतर भाजप नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. या टीकेला नवाब मलिक यांनी उत्तर दिले आहे.

भाजपाचे काही नेते मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरत आहेत आणि एक मंत्री तुरुंगात जाणार असल्याचे भाकीत करत आहेत, हे बोलणं योग्य नाही असे नवाब मलिक म्हणाले. सभ्य समाजात आणि राजकारणात असंसदीय शब्दांचा प्रयोग होत असेल तर तो चुकीचा आहे. प्रत्येकाने मर्यादेत राहून भाषेचा वापर केला पाहिजे, असा सल्ला देखील मलिक यांनी दिला आहे.

तसेच, महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर चालते. कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना त्यांची विचारधारा सोडून सरकारमध्ये सामील झालेले नाही. धर्माच्या आधारावर राजकारण करणे हा आमचा कार्यक्रम नाही. भाजपा धर्माच्या आधारावर राजकारण करुन मतांचे राजकारण करते हे लोकांना माहित आहे, असं देखील नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

शिवसेना आणि भाजप या दोघांच्या वादात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्य परिस्थितीचा भाजपाला आरसा दाखवला आहे. वेगवेगळे भाष्य करुन भाजपा जनतेची दिशाभूल करण्याचे काम कसे करते, हे दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले असल्याचेही नवाब मलिक म्हणाले आहेत.