करोनाचे विदारक रुप सध्या देशात पहायला मिळत आहे. सर्व राज्ये आपापल्या परीने करोना संकटाचा सामना करत आहेत. मात्र परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे. ऑक्सिजन, व्हेंटीलेटर आणि रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता भासत आहे. केंद्राकडून राज्यांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. “करोनाचं संकट मोठं आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवा. त्यातून मार्ग काढा. पंतप्रधान नरेंद्र मोदी एकटे करोनाशी लढू शकत नाहीत,” असं ट्वीट नवाब मलिक यांनी केलं आहे.

देशातली करोनाची परिस्थिती आता बिकट होत चालली असल्याचं सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्यावर आरोप केला आहे. हे दोघे त्यांची जबाबदारी नाकारत असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

देशात करोनाचा उद्रेक सुरू आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज करोनाबाधितांची आकडेवारी जाहीर केली. देशात सलग तिसऱ्या दिवशी चार लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत देशात ४ लाख १४ हजार १८८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही काळजीचा विषय ठरत असून सलग ११ व्या दिवशी तीन हजारांहून अधिक बळींची नोंद झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत ४ लाख १४ हजार १८८ नवे रुग्ण आढळले असून यासोबत एकूण रुग्णसंख्या २ कोटी १४ लाख ९१ हजार ५९८ वर पोहोचली आहे. दरम्यान ३९१५ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत २ लाख ३४ हजार ८३ जणांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. देशात सध्या ३६ लाख ४५ हजार १६४ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.