News Flash

नायर रुग्णालयातील डॉक्टर, वॉर्डबॉय आणि महिला कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

मृत राजेशच्या कुटुंबियांसह आमदार लोढांचे डीनच्या केबिनमध्ये धऱणे आंदोलन

नायर रुग्णालयातील डीनच्या कार्यालयात निषेध आंदोलन करताना मृत राजेश मारुच्या नातेवाईकांसह आमदार मंगलप्रभात लोढा.

नायर रुग्णालयातील एमआरआय रुममध्ये अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याप्रकरणी रुग्णालयातील तिघांवर निलंबनाच्या कारवाईसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये डॉक्टर, वॉर्डबॉय आणि महिला कर्मचाऱ्याचा समावेश आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून मृत तरुणाच्या कुटुंबियांना तत्काळ ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.


डॉ. सिद्धांत शहा, वॉर्डबॉय विठ्ठल चव्हाण आणि महिला कर्मचारी सुनिता सुर्वे यांच्यावर निलंबनाच्या कारवाईसह कलम ३०४ (हलगर्जीपणामुळे मृत्यूला कारणीभूत) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी घटनेचे चित्रण झालेले सीसीटीव्ही फुटेज रुग्णालय प्रशासनाने पोलिसांकडे सुपूर्द केले आहे. दरम्यान, मृत राजेश मारू याच्या कुटुंबासह स्थानिक नागरिक आणि भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा हे रुग्णालयाचे डीन यांच्या कार्यालयात ठिय्या मांडत निषेध आंदोलनाला बसले होते.


राजेश मारूची आई आजारी असल्याने त्यांना एमआरआय चाचणी करण्याची सुचना डॉक्टरांनी केली होती. त्यानुसार, नायर रुग्णालयातील एमआयआर रुमममध्ये तो आईला घेऊन गेला. येथे रुमबाहेर वॉर्डबॉयने राजेशच्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि घड्याळ सुरक्षेसाठी काढून घेतले होते. मात्र, रुग्णासाठीचा ऑक्सिजन सिलेंडर त्याला आत घेऊन जाण्यास सांगण्यात आले. सुरुवातीला त्याने विरोध केला मात्र, वॉर्डबॉयने सांगितले की एमआरआय मशीन बंद असून अद्याप सुरु करण्यात आलेले नाही. त्यानंतर राजेश रुममध्ये गेला आणि एमआरआय मशिनने तत्काळ सिलेंडरला आपल्याकडे खेचून घेतले. सिलेंडरला पकडून राजेशही या मशिनमध्ये अडकला गेला.

मशिनमध्ये खेचले गेल्याने उच्च दाबामुळे त्या सिलेंडरचे झाकण उघडले गेले आणि त्यातील संपूर्ण वायू हा राजेशच्या पोटात गेला. वॉर्डबॉयच्या मदतीने राजेशच्या नातेवाईकांनी त्याला मशिनमधून बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. त्याला बाहेर काढण्यात आले आणि ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2018 2:47 pm

Web Title: nayar hospital doctor wardboy woman employee was arrested on suspension of action
Next Stories
1 एमआरआय मशीनमध्ये थरकाप उडवणारा मृत्यू; मुंबईतील रुग्णालयात घडली धक्कादायक घटना
2 रुग्णालयांवर सरकारी नियंत्रण? उपचाराचे दर जाहीर करणे बंधनकारक
3 विरोधी आघाडीचे नेतृत्व शरद पवारांकडे !
Just Now!
X