राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. सकाळी दहा वाजल्यापासून त्यांची एनसीबीच्या कार्यालयात चौकशी सुरु होती. आरोपी करन सजनानीच्या चौकशीमध्ये समीर खान यांचं नाव आल्याने एनसीबीनं त्यांना समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावलं होतं.

सुत्रांच्या माहितीनुसार, ब्रिटीश नागरिक असलेल्या करन सजनानी याला समीर खान यांनी गुगल पे द्वारे २० हजार रुपये पाठवले होते. हे पैसे ड्रग्जसाठी पाठवल्याचं एनसीबीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. खान हे करन सजनानीच्या नेहमी संपर्कात होते. याबाबत एनसीबीने त्यांची चौकशी सुरु केली आहे. उद्या खान यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे.

एनसीबीने वांद्रे येथून ब्रिटीश नागरिक करन सजनानी आणि बॉलीवूड अभिनेत्रीची पूर्व मॅनेजर राहिला फर्निचरवाला यांना गांजासह अटक केली होती. यावेळी करन सजनानी याच्याकडून मुच्छड पानवाल्याला गांजा पुरवला जात होता अशी माहिती चौकशीत समोर आली. राहिला फर्निचरवालासुद्धा मदत करत होती असं एनसीबीचं म्हणणं आहे. यानंतर एनसीबीकडून सोमवारी मुच्छड पानवाल्याची चौकशी करण्यात आली आणि नंतर अटकेची कारवाई झाली.