अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणापासून सुरू झालेलं Bollywood Drugs Connection अद्याप थांबण्याचं नाव घेत नाहीये. NCB अर्थात अंमली पदार्थ विरोधी पथकाने गुरुवारी रात्री केलेल्या धडक कारवाईत मुंबईतील परदेशी ड्रग्जचा सर्वात मोठा सप्लायर फारूक बटाटाचा मुलगा शादाब बटाटा एनसीबीच्या हाती लागला आहे. त्याच्याकडून एनसीबीनं तब्बल २ कोटी रुपयांचं ड्रग्ज हस्तगत केलं आहे. शादाब बटाटा हा गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबई आणि देशभरातल्या ड्रग्जच्या व्यवसायाशी संबंधित होता. तसेच, बॉलिवुडमधल्या अनेक सेलिब्रिटींना Shadab Batata ड्रग्ज पुरवत होता, असं देखील समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा बॉलिवुडमधले ड्रग्ज कनेक्शन समोर येण्याची शक्यता आहे.

ड्रग्जचं बॉलिवुड कनेक्शन

आत्तापर्यंत सुशांत सिंह राजपूत प्रकरणापासून बॉलिवुडमधल्या अनेक सेलिब्रिटींची नावं ड्रग्ज प्रकरणात समोर आली आहे. यामध्ये अभिनेता अर्जुन रामपालचं देखील नाव समाविष्ट आहे. या प्रकरणाचे धागेदोरे अनेक सेलिब्रिटींच्या दारापर्यंत पोहोचायला लागल्यापासून एनसीबीनं अधिक खोलात तपास सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून एनसीबीनं गुरुवारी रात्री उशिरा केलेल्या कारवाईमध्ये फारूकचा मुलगा शादाब एनसीबीच्या जाळ्यात अडकला आहे.

लोखंडवाला, वर्सोवा, मीरा रोडमध्ये छापे

एनसीबीनं दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री लोखंडवाला, वर्सोवा आणि मीरा रोड या भागांमध्ये मारलेल्या छाप्यांमध्ये २ कोटी रुपये किंमतीचं MDMA ड्रग्ज सापडलं आहे. त्यासोबतच, काही महागड्या कार देखील हस्तगत केल्या आहेत. याशिवाय छाप्यामध्ये एक नोटा मोजण्याचं मशिन देखील NCB ला सापडलं आहे.

MDMA सोबतच फारूख बटाटा एलएसडी, गांजा, बड आणि कोकेनसारखं ड्रग्ज देखील पुरवायचा अशी माहिती एनसीबीला मिळाली आहे. गुरुवारी दिवसभर एनसीबीकडून या प्रकरणात कारवाई केली जात होती. यामध्ये दाऊद इब्राहिमचा हस्तक चिंकू पठाण याच्या डोंगरी आणि नागपाडा भागातल्या ठिकाणांवर एनसीबीनं छापे मारले.

गोव्यातून ‘महाराज’ अटकेत

याआधी ७ मार्च रोजी एनसीबीनं गोव्यामध्ये छापा टाकला होता. झी न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार, या छाप्यामध्ये एनसीबीनं हेमंत साह उर्फ महाराजला अटक केली होती. सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी अनुज केसवानी आणि रीगल महाकाल यांच्याकडून महाराजबद्दल माहिती मिळाली होती. त्यानुसार छापा मारून त्याला अटक करण्यात आली आहे.