अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) मुंबई आणि परिसरात पाच ठिकाणी छापे टाकले आहेत. या छाप्यांदरम्यान बॉलिवूड निर्माते फिरोज नाडियादवाला यांच्या घरातून ड्रग्ज जप्त करण्यात आले. ड्रग्जप्रकरणी फिरोज व त्यांच्या पत्नीची एनसीबीकडून चौकशी सुरू आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने हे वृत्त दिलं आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात समोर आलेल्या बॉलिवूडमधील ड्रग्ज अँगलनंतर एनसीबीने सुरु केलेली कारवाई अद्यापही सुरुच आहे.

फिरोज यांच्या घरी एनसीबीने केलेल्या कारवाईअंतर्गत १० ग्रॅम गांजा, तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली एनसीबीने मुंबईत पाच ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. यामध्ये मालाड, अंधेरी, लोखंडवाला, खारघर आणि कोपरखैराणे या भागांचा समावेश आहे.

बॉलिवूडमधील ड्रग्जप्रकरणी एनसीबीनं आतापर्यंत अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींची चौकशी केली आहे. यामध्ये श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोण, रकुलप्रीत सिंग, सारा अली खान यांचा समावेश आहे. ड्रग्ज पुरवठ्याप्रकरणी यांची चर्चा झाल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यावरुन त्यांना एनसीबीनं आपल्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावलं होतं.