पक्षाचा आज १७वा वर्धापनदिन
छगन भुजबळ यांना गैरव्यवहाराच्या आरोपांवरून झालेली अटक, पक्षाच्या नेत्यांवर होणारे आरोप व त्यातून प्रतिमेला बसलेला धक्का, भूमिकेत सातत्याचा अभाव, कार्यकर्त्यांमध्ये आलेले नैराश्य यामुळे उद्या आपला १७वा वर्धापनदिन साजरा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.
पक्षाच्या स्थापनेनंतर गेली दीड वर्षे सत्तेबाहेर असलेल्या राष्ट्रवादीला विरोधी पक्षाची जागा अद्याप घेता आलेली नाही. दुष्काळ किंवा विविध प्रश्नांवर सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक भूमिका घेत असली तरी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचे भाजपशी असलेले घनिष्ठ संबंध लक्षात घेता पक्षाबद्दल संशयाची भावना निर्माण होते. कधी भाजप तर कधी काँग्रेस, असा दोन्ही डगरींवर पाय ठेवण्याच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेने वेगळा संदेश जातो. राष्ट्रवादीबद्दल एकूणच संशयाचे वातावरण असल्याने काँग्रेसमधील नाराजांना पूर्वीप्रमाणे राष्ट्रवादीचे आकर्षण वाटत नाही.
छगन भुजबळ यांना झालेली अटक किंवा अजित पवार वा सुनील तटकरे या नेत्यांच्या विरोधात चौकशीच्या टांगत्या तलवारीमुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य आले आहे. पक्षाचे मुख्यालय किंवा अन्यत्र जिल्हा पातळीवर पक्षाच्या कार्यालयांमधील आटलेली गर्दी यातून त्याचे प्रत्यंतर येते. मराठवाडय़ात दुष्काळी परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर भाजप सरकारच्या विरोधात वातावरण तापविण्याचा राष्ट्रवादीने प्रयत्न केला. सरकारच्या विरोधात मोर्चे काढले. पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांपेक्षा कार्यकर्त्यांचीच गर्दी जास्त होती.