मुंबई : ‘५६ इंचाच्या छातीवाल्यांसाठी ५६ प्रश्न’ या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ५६ दिवस भाजपला उद्देशून प्रश्न विचारण्यात येणार असून, आतापर्यंत सात सवाल उपस्थित करण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी आणि भाजपच्या मधूर संबंधांबाबत नेहमी चर्चा होत असताना राष्ट्रवादीने आता भाजपच्या विरोधात आघाडी उघडली आहे. राष्ट्रवादीच्या वतीने ५६ इंचाच्या छातीवाल्यांसाठी म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून सवाल केला जातो.

आतापर्यंत सात सवाल विचारण्यात आले आहेत.  ‘एका सैनिकाच्या बदल्यात दहा पाकिस्तानी सैनिकांचे शीर आणण्याचे मोदी यांनी आश्वासन दिले होते. टक्कर तर दूर साखर घेऊन आले. या आश्वासनाचे काय झाले, असा सवाल राष्ट्रवादीने केला आहे. जयंत पाटील, सुनील तटकरे, नवाब मलिक, दिलीप वळसे-पाटील आदी नेत्यांच्या व्टिटर हॅण्डलवरून हा सवाल विचारला जातो.

भाजपने प्रचाराच्या काळात दिलेली आश्वासने चार वर्षांत पाळलेली नाहीत. पुन्हा नव्याने आश्वासने देण्याची मालिका सुरू झाली आहे. यामुळेच जुन्या आश्वासनांचे काय झाले हे जाणून घेण्याकरिताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोदी यांना उद्देशून सवाल केला जातो. भाजपचा जाहीरनामा किंवा वेळोवेळी दिलेली आश्वासने याच्याच आधारे प्रश्न विचारण्यात येत आहेत. आतापर्यंत सात सवाल उपस्थित करण्यात आले. पण एकाही प्रश्नाला भाजपने उत्तर दिलेले नाही.

– नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस मुख्य प्रवक्ते

राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला सवाल करण्यापूर्वी स्वत:ला भेडसावणारे प्रश्न सोडवावेत.  राष्ट्रवादीचे अंतर्गत प्रश्न गंभीर आहेत. इतरांना प्रश्न विचारण्यापूर्वी स्वत:ची सारखी पीछेहाट का होते याचे राष्ट्रवादीने आत्मपरीक्षण करावे.

– माधव भांडारी, भाजपचे मुख्य प्रवक्ते