राज्यातील मुस्लीम समाजाला शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसने केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीने रविवारी यशवंतराव चव्हाण केंद्राच्या सभागृहात मुस्लीम आरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार तारिक अन्वर, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रमुख प्रवक्ते नवाब मलिक, अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. जलालुद्दीन, नरेंद्र वर्मा आदी नेते उपस्थित होते. आघाडी सरकारने मुस्लीम समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. तसा अध्यादेशही काढला. परंतु त्यानंतर सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेना सरकारने मुस्लीम आरक्षण रद्द केले. त्याबद्दल परिषदेत युती सरकारवर टीका करण्यात आली.
राज्यातील भाजप सरकारने गोवंश हत्याबंदी कायदा केला असला तरी, त्याचा संबंध शेतकऱ्यांशी आहे, मुस्लिमांशी नाही, अशी भूमिका परिषदेत मांडण्यात आली. त्यामुळे या विषयावर काही बोलायचे नाही, परंतु आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करण्याचा इशारा सर्वच वक्त्यांनी दिला. मुस्लीम समाजाच्या आरक्षणासाठी सर्व पुरोगामी संघटनांनी एकत्र यावे, असे आवाहन तारिक अन्वर यांनी केले.