दुष्काळग्रस्त भागात १४ व १५ सप्टेंबरला आंदोलन
मराठवाडय़ासह अन्य काही भागांत दुष्काळाचा प्रश्न हाताळण्यावरून राज्य सरकारच्या विरोधात तयार झालेल्या वातावरणाचा राजकीय फायदा उठविण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने भर दिला आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात राज्य सरकारच्या विरोधात १४ आणि १५ तारखेला आंदोलन केले जाणार आहे.
दुष्काळग्रस्त मराठवाडय़ात जनतेमध्ये पिण्यासाठी पाणी तसेच गुरांना चारा आणि पाणी मिळत नसल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजीची भावना आहे. पिण्याच्या पाण्याकरिता लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्हय़ांतील काही गावांमध्ये वणवण भटकावे लागत आहे. दुष्काळी परिस्थिती किंवा शेतीचे नुकसान झाल्यावर मदतीवरून नेहमीच सरकारच्या विरोधात संतप्त भावना असते. त्यातच कर्जमाफीची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावल्याने हा मुद्दा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने तापविला आहे. सरकारच्या विरोधातील या नाराजीचा लाभ उठविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. पुढील वर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असून तोपर्यंत सरकारच्या विरोधात जास्तीत जास्त वातावरणनिर्मिती करण्याची राष्ट्रवादीची योजना आहे.
राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत दुष्काळी परिस्थितीचा गुरुवारी आढावा घेतला. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, मधुकरराव पिचड, वसंत डावखरे आदी नेते या प्रसंगी उपस्थित होते. आधी जाहीर केल्याप्रमाणे १४ तारखेला मराठवाडय़ातील आठ जिल्हे, तर १५ तारखेला उत्तर महाराष्ट्रात जेल भरो आंदोलन केले जाणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केले. परतीचा पाऊस चांगला झाला नाही तर राज्यातील दुष्काळी परिस्थिती अधिक चिंताजनक बनेल, अशी भीती पवार यांनी व्यक्त केली. दुष्काळग्रस्त जनतेला धीर देण्याकरिता पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, अशी सूचना पवार यांनी केली.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. मराठवाडय़ाबरोबरच खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागावर राष्ट्रवादीने लक्ष केंद्रित केले आहे. पवार हे उद्या माण आणि खटाव या दुष्काळी भागांचा दौरा करणार आहेत.
राष्ट्रवादीबद्दल सध्या जनमानसात फारशी चांगली भावना नाही. दुष्काळी परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर शेतकरी वर्गाच्या मदतीला धावून जात ग्रामीण भागात राजकीय बस्तान पुन्हा एकदा बसविण्यावर राष्ट्रवादीने भर दिला आहे, कारण गेल्या निवडणुकीत ग्रामीण भागातच फटका बसला होता.