25 February 2021

News Flash

मुंबई महापालिका बरखास्त करून प्रशासक नेमा – अजित पवार

जलसंकटावर बोलताना अजित पवार यांनी शिवसेना व सरकारवर निशाणा साधला

(संग्रहित छायाचित्र)

२० वर्षांपेक्षा जास्त काळ मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. मात्र सगळं व्यवस्थित काम करत आहे असं सांगितलं जातंय. त्यामुळे महापौर, उपमहापौर चुकत असतील तर त्यांच्यावर कारवाई करा, वेळ पडली तर प्रशासक आणा, मनपा बरखास्त करून टाका अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केली. मुंबईसह राज्यात कोसळलेल्या जलसंकटावर बोलताना अजितदादा पवार यांनी शिवसेनेसह सरकारवर निशाणा साधला.

मुंबई तुंबल्यावर यांच्या कामाची पोलखोल होते त्यामुळे याच्या खोलात जावून चौकशी व्हावी आणि जबाबदार पदाधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा त्याशिवाय यांचे डोळे उघडणार नाही अशा शब्दात अजित पवार यांनी आपला संताप व्यक्त केला.

मनुष्याला एकदाच जन्म मिळतो त्यामुळे किडया मुंग्यासारखं लोक मरत असतील तर हे सरकारचे अपयश आहे. हा सरकारचा कमीपणा आहे. त्यामुळे याची सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे. त्यामुळे अशा घटना घडू नयेत ही जबाबदारी सरकारने घ्यावी अशी मागणीही अजित पवार यांनी केली.

मुंबईत प्रचंड पाऊस पडतोय. लोकांचा जीव धोक्यात आलाय. लोक जखमी झाले आहेत. त्यांना भरीव मदत द्यावी अशी मागणी करतानाच गेलेली व्यक्ती भरीव मदत दिल्यामुळे परत येत नाही. कर्ती व्यक्ती गेली की, घर आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होते. ती व्यक्ती परराज्यातील, परजिल्हयातील असो असेही अजित पवार म्हणाले.

मुंबई ही तुमची माझी देशाची आर्थिक राजधानी पुर्णपणे ठप्प झाली आहे. मुंबईत पाणी तुंबले आहे आणि मुंबईचे प्रथम नागरिक मुंबई तुंबली नाही असं सांगत आहेत. काय केल्यावर मुंबई तुंबली हे यांना कळणार आहे असा टोला अजित पवार यांनी महापौरांना लगावला.

मिठी नदीचा मुद्दाही अजितदादा पवार यांनी सभागृहात उपस्थित केला. मिठी नदीसाठी केंद्राने आर्थिक मदत केली आहे आणि राज्य सरकार वेळोवेळी मदत करत आहे असं असताना मिठी नदीचे काम का पुर्ण नाही अशी विचारणा केली. मुंबईकरांना सकाळपासून त्रास सहन करावा लागत आहे. पाऊस पडला की याची चर्चा होते. ही तेवढ्यापुरती चर्चा होऊन तेवढ्यापुरतं उत्तर मिळतं परंतु याची जबाबदारी कुठल्या खात्यावर आहे हे सांगितले जात नाही. कामाचा दर्जा चांगला राहणार नसेल तर हे सरकारला भूषणावह नाही असेही अजित पवार म्हणाले.

पुण्यातील कोंढवा, सिंहगड परिसरातील दुर्दैवी घटना असेल किंवा मुंबईतील मालाड परिसरातील दुर्दैवी घटना असो याबाबत अजित पवार यांनी बिल्डर आणि संबंधित अधिकारी यांच्या एकंदरीत कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2019 1:56 pm

Web Title: ncp ajit pawar bmc mumbai rain monsoon session vidhansabha sgy 87
Next Stories
1 १९ मजुरांच्या मृत्यूंना महापालिका नाही तर पाऊस जबाबदार-संजय राऊत
2 मुंबई बुडवून दाखवली हे शिवसेनेने मान्य करावं : अशोक चव्हाण
3 मध्य रेल्वेकडून एक रेल्वे दिवसभरासाठी तर सात अल्पकालवधीसाठी रद्द
Just Now!
X