पतीच्या मद्य कारखान्यास पाणीपुरवठय़ाचा हट्ट; राष्ट्रवादीचा आरोप
राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मराठवाडय़ातील मद्यानिर्मिती कंपन्यांच्या पाणीपुरवठय़ात कपात केली जाऊ नये, अशी आग्रही भूमिका मांडली आहे. मात्र, या भूमिकेमागे स्वार्थाची किनार असून पतीच्या कारखान्यासाठीच त्यांनी हा हट्टाग्रह धरला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. तसेच त्यांच्या पतीचे दोन नावे कसे असा सवाल करत नावांबाबतचा गोंधळ दूर करावा अशी मागणीही राष्ट्रवादीने केली आहे.
पंकजा मुंडे यांचे पती चारुदत्त पालवे यांचा शेंद्रा औद्योगिक वसाहतीत रॅडिको डिस्टिलरीज हा मद्यनिर्मितीचा कारखाना आहे. चारुदत्त हे या कारख्यानाचे संचालक असून पंकजा याही पूर्वी संचालकपदी होत्या. या कारखान्याला शासकीय योजनेतून पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळेच दुष्काळग्रस्त मराठवाडय़ातील मद्यनिर्मिती कंपन्यांचा पाणीपुरवठा तोडण्यात यावा, अशी आवई उठल्यावर पंकजा यांनी त्यास कडाडून विरोध केला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. लोकांना पिण्यासाठी पाणी नसताना मद्यनिर्मिती कारखान्यांचे पाणी तोडण्यास विरोध करण्यामागे पंकजा मुंडे यांची स्वार्थाची किनार असल्याचेही मलिक यांनी म्हटले आहे. पंकजा यांनी मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना पाणी देण्याची भूमिका मांडली असताना मुख्यमंत्र्यांनी ही मागणी फेटाळत पंकजा यांना दणकाच दिल्याचा आरोपही राष्ट्रवादीने केला. पंकजा यांचे पती राजकीय वर्तुळात अमित पालवे या नावाने तर उद्योगांत ते चारुदत्त या नावाने वावरतात.