निवडणुकीत काँग्रेसबरोबर आणि निकालानंतर काही वेगळे घडल्यास सारे पर्याय खुले, हाच स्पष्ट संदेश राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने दिला आहे. महाराष्ट्रात काँग्रेसबरोबर, अन्य राज्यांमध्ये काँग्रेसच्या विरोधात तसेच भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे समर्थन यातून राष्ट्रवादीने काँग्रेसलाही सूचक इशारा दिला आहे.
राहुल गांधी यांनी मुलाखतीत नरेंद्र मोदी यांच्यावर गुजरात दंगलीवरून दोषारोप केला. त्याच वेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोदी यांना न्यायालयाने दिलासा दिल्याचा मुद्दा मांडून गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे समर्थन केले. राहुल गांधी यांनी मोदी यांना विरोध करीत असताना राष्ट्रवादीने मोदी यांची बाजू उचलून धरल्याने काँग्रेसमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. मोदी प्रेमातून राष्ट्रवादीने सूचक इशारा दिला आहे.
राज्यात काँग्रेसबरोबर आघाडी कायम ठेवण्याचे राष्ट्रवादीने यापूर्वीच जाहीर केले आहे. जनमत चाचण्यांमध्ये काँग्रेसची पीछेहाट होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. एकूणच देशातील वातावरण सध्या काँग्रेस विरोधात आहे. अशा वेळी राष्ट्रवादीने निकालानंतर सारे पर्याय खुले असतील, असेच सूचित केले आहे.
जातीयवादावरून राष्ट्रवादीचे नेते भाजपला दूषणे देत असले तरी केंद्रात भाजपप्रणीत सरकार सत्तेत असताना शरद पवार यांच्याकडे आपत्कालीन व्यवस्थापन विभागाची जबाबदारी सोपावून त्यांना कॅबिनेट दर्जा देण्यात आला होता. ही पाश्र्वभूमी लक्षात घेता काहीही अशक्य नाही, अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली जाते.
निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला परस्परांची गरज भासणार असली तरी राष्ट्रवादीला काँग्रेसच्या मदतीची जास्त आवश्यकता आहे. काँग्रेसची पारंपरिक मते राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळतात, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. यामुळेच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसबरोबर राष्ट्रवादी आघाडी कायम ठेवेल. १० ते १२ खासदारांचे पाठबळ असल्यास निकालानंतर सत्तासंपादनात महत्त्व येऊ शकते.
म्हणूनच जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याचा पवार यांचा प्रयत्न आहे. निकालानंतर एकूणच घोळ तयार झाल्यास राष्ट्रवादीपुढे तिसऱ्या आघाडीचा पर्याय असू शकतो. १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हाच शरद पवार यांनी सारे पर्याय खुले असल्याचे विधान केले होते. हे विधान अजूनही लागू आहे. काँग्रेसचा विरोध असलेल्या मोदी यांच्याबाबत मुद्दामहूनच मवाळ भूमिका घेत राष्ट्रवादीने काँग्रेसला सूचक इशारा दिला आहे.

पटेल यांच्या विधानाचा अनर्थ – मलिक
नरेंद्र मोदी यांच्याबाबत प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याची सारवासारव राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा, असे त्यांनी म्हटले असून त्यात चुकीचे काहीच नाही. मोदी यांना विशेष चौकशी पथकाने दिलेली क्लिनचिट कनिष्ठ न्यायालयाने मान्य केली. अजून उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात खटला चालणार आहे याकडेही मलिक यांनी लक्ष वेधले.