डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू स्मारकावरून आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीत श्रेयाची लढाई सुरू झाली आहे. इंदू मिलची जागा मिळवून देऊन वचनपूर्ती केल्याचे निमित्त करून काँग्रेसने उद्या वचनपूर्ती मेळावा आयोजित केला असून त्यासाठी जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी केली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही पक्षाच्या नव्या पंचतारांकित कार्यालयाच्या उद्घाटनाचा घाट घातला आहे. .
पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून प्रदेश काँग्रेसतर्फे शुक्रवारी सायन येथील सोमय्या ग्राऊंडवर राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दिलेली अनेक आश्वासने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील केंद्र व राज्य सरकारने पूर्ण केल्याचा दावा करीत पक्षाने या मेळाव्याला ‘वचनपूर्ती मेळावा’ असे नाव दिले आहे. जनहिताच्या निर्णयात आपला पक्ष राष्ट्रवादीपेक्षा वरचढ असल्याचे या मेळाव्याच्या माध्यमातून लोकांना पटवून देण्याची काँग्रेसची योजना आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळवून देण्याचा मुद्दा असो, गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न असो वा कोल्हापूरात छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक उभारण्याचा प्रश्न असो मुख्यमंत्री पृथ्वाराज चव्हाण यांनी हे प्रश्न मार्गी लावले. उद्याच्या वचनपूर्ती मेळाव्यात या निर्णयांचे श्रेय घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल.
एकीकडे काँग्रेसने वचनपूर्ती मेळाव्याच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी केलेली असतानाच त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेही कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पक्षाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या अलिशान कार्यालयाचे उद्घाटन उद्या पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. सुसज्ज अशा या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात शरद पवार काय बोलणार याबाबत राजकीय क्षेत्रात उत्सुकता आहे. आम्हीही लोकांना वचने दिली आणि पूर्णही केली. छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकाचे श्रेय आम्ही घ्यायचे काय असा सवाल करीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी आजच काँग्रेसच्या मेळाव्यावर टीकास्त्र सोडले.
त्यामुळे उद्याच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या  अजेंड्यावर काँग्रेसचा मेळावाच असेल, अशीच शक्यता वर्तविली जात आहे.