सोमवारी चौकशीस हजर राहण्याचे निर्देश

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशीसाठी चौथ्यांदा समन्स बजावण्यात आला आहे. त्यांना सोमवार, २ ऑगस्टला हजर राहण्यास ‘ईडी’ने सांगितले आहे. तसेच अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश याच्यावरही ‘ईडी’ने समन्स बजावले असून त्यालाही सोमवारी हजर राहण्याचा आदेश दिला आहे.

अनिल देशमुख यांना यापूर्वी तीन वेळा ‘ईडी’ने समन्स बजावला होता. मात्र देशमुख यांनी चौकशीस जाणे टाळले होते. तसेच त्यांची पत्नी आणि मुलालाही ‘ईडी’ने समन्स बजावला होता. मात्र तेही चौकशीला हजर झाले नव्हते. देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला बार मालकांकडून दरमहिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. याप्रकरणामुळे अडचणीत आलेल्या अनिल देशमुख यांची आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी चौकशी सुरू आहे. ‘ईडी’ने त्यांच्या घरावर छापा टाकला होता.

देशमुख कुटुंबीयांनी दिल्लीस्थित बनावट कंपनीच्या माध्यमातून चार कोटी १८ लाख रुपयांची रक्कम श्री साई शिक्षण संस्थेत वळविल्याचा दावा ईडीने केला आहे.

अकबर पठाण यांना दिलासा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात दाखल गुन्ह्यात सहआरोपी असलेले पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांना पुढील सुनावणीपर्यंत अटक केली जाणार नाही, अशी हमी राज्य सरकारतर्फे शुक्रवारी उच्च न्यायालयात देण्यात आली.

परमबीर सिंह यांच्यासह २८ जणांविरोधात गुन्हा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, पाच पोलीस अधिकारी आणि एक कर्मचारी यांच्यासह २८ जणांविरोधात शुक्रवारी खंडणी वसूल करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, जबरी चोरी यासारख्या १० हून अधिक कलमांतर्गत ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये पोलीस उपायुक्त दीपक देवराज, साहाय्यक पोलीस आयुक्त एन. टी. कदम, खंडणी विरोधी पथकाचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोरे, पोलीस कर्मचारी चौधरी यांचा सामावेश आहे.