मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी अखेर खासदार संजय दिना पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून मुंबई राष्ट्रवादीची १३८ जणांची जम्बो कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे गेले अनेक दिवस राष्ट्रवादीच्या नियुक्तांबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार यावरुन उलटसुलट चर्चा सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रांताध्यक्ष मधुकरराव पिचड आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर केली. त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
अध्यक्षपदी संजय दिना पाटील, उपाध्यक्षपदी बापू भुजबळ, सुभाष मयेकर, मधुकर शिंदे, सदानंद शेट्टी यांच्यासह ३० जणांची, तसेच सरचिटणीसपदी मोहन म्हामुळकर, बबन कनावजे, अ‍ॅड. मंगेश बनसोड यांच्यासह २३ जणांची, चिटणीसपदी राजा भेसले, संजय धुवाळी, मंगला मांढरे, डॉ. कुरेश झोराबी यांच्यासह ३६ जणांची, सहसचिपदी संजय तटकरे, अवधुत वाघ, हरिश्चंद्र राणे, रुपेश खांडके यांच्यासह २५ जणांची, तर संघटक सचिवपदी ताजुद्दीन इनामदार, सुहेल सुभेदार, प्रदीप टपके, प्रीती उपाध्याय यांच्यासह १९ जणांची नियुक्ती करण्यात आली.
तसेच सिद्धार्थ कांबळे यांची खजिनदारपदी, तर उदयप्रताप सिंग, क्लाईड रॉकी क्रास्टो, मोहम्मद अर्शद यांची प्रवक्ता व सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली.