काही झालं तरी युती करणार नाही अशी घोषणा करता करता अखेर शिवसेना भाजपाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी हातमिळवणी केली आहे. गेल्या साडे चार वर्षांपासून सतत एकमेकांवर टीका करणाऱ्या शिवसेनेने भाजपाशी युती केल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तर बॅनरबाजी करत ‘आम्ही सत्तेला लाथ मारु’ या वाक्यालाच आदरांजली वाहिली आहे.

भाजपाशी युती करताच शिवसेनेला राजीनामा खिशात, सत्तेला लाथ मारु या वाक्यांची आठवण करुन देत सोशल मीडियावर टोले लगावण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने देखील ‘आम्ही सत्तेला लाथ मारू’ या ऐतिहासिक वाक्याला भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. शिवसेना भवन आणि मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी हे बॅनर लावण्यात आले आहेत.

परस्परांवर टोकाची टीका आणि स्वबळावर लढण्याची भीमगर्जना करूनही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने अखेर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी युतीची घोषणा केली. लोकसभेसाठी शिवसेनेला २३ आणि भाजपला २५, तर विधानसभेसाठी मित्रपक्षांच्या जागा सोडून उरलेल्या जागांचे समसमान वाटप, या तत्त्वावर युती झाली आहे.

मध्यंतरी उभयतांमधील संबंध काहीसे ताणले गेले होते, पण उद्धव ठाकरे यांनी मन मोठे केल्याने आता कटुता संपली असून दोघेही पुन्हा एकत्र आलो आहोत. यातून महाराष्ट्रातील ४८ पैकी लोकसभेच्या ४५ जागा जिंकू असे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले. तर, युती करीत असलो तरी भाजप नेतृत्वाकडून पुन्हा कटू अनुभव येता कामा नये, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.