राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर टीका केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. शरद पवार यांनी पार्थ पवार अपरिपक्व असून, त्याच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही अशा शब्दांत बुधवारी फटकारलं. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ‘नया है वह’ अशी मार्मिक टिप्पणी केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

“शरद पवारांनी सांगितल्यावर मी पुन्हा त्यावर काही बोलण्याची, सांगण्याची गरज नाही. शरद पवारांनी ते थोडे अपरिपक्व असल्याचं म्हटलं आहे. हिंदीत सांगायचं झालं तर नया है वह,” असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. यावेळी छगन भुजबळ यांनी पवार कुटुंबात कोणीही नाराज नसल्याचं सांगितलं.

सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या पार्थ पवारांना शरद पवारांनी फटकारलं

“आम्हीसुद्धा पवार कुटुंबाचे सदस्य आहोत. अजित पवार किंवा इतर कोणीही दुखावलं गेलेलं नाही. आम्ही सगळे एकत्रित आहोत. कुटुंबातील सदस्यांना बोलण्याचं, सुचवण्याचं, समजावण्याचं काम वरिष्ठ माणसं करतच असतात,” असंही छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितलं.

“आता नातवांनी आजोबांना…,” शरद पवारांनी पार्थ पवार यांना फटकारल्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया

पार्थ पवार यांच्या भूमिकेमुळे गेले तीन-चार दिवस राष्ट्रवादीची पंचाईत झाली होती. अभिनेता सुशांतसिंह याच्या आत्महत्येची सीबीआय चौकशीची मागणी भाजपाकडून करण्यात येत असताना महाविकास आघाडी सरकारकडून मुंबई पोलीस हा तपास योग्यपणे करीत असल्याची ग्वाही दिली जात आहे. त्याच वेळी पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांतसिंहच्या आत्महत्येची सीबीआय चौकशीची मागणी करणारे पत्र दिले होते. या पत्राची प्रत आणि गृहमंत्र्यांना निवेदन देतानाचे छायाचित्र त्यांनी समाजमाध्यमावर प्रसिद्ध केले होते.