शिवसैनिकांना एकत्रित ठेवण्यासाठी शिवसेनेच्या नेतृत्वाने कार्यकर्त्यांना गंडेदोरे बांधल्याचे वाचनात आले. नव्याने करण्यात आलेल्या जादूटोणा कायद्यानुसार हा गुन्हा आहे अशी माहिती मला देण्यात आली. आता सरकारच काय ते बघेल, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी लगावला. शिवसेना-भाजप यांच्यासह आलेल्या छोटय़ा पक्षांच्या महायुतीचा कोणताही परिणाम दिसणार नाही, असेही ते म्हणाले.
शिवसेनेने गुरुवारी मुंबईत भव्य सभा घेऊन सर्व शिवसैनिकांना ‘शिवबंधना’ची प्रतिज्ञा दिली. याबाबत प्रतिक्रिया विचारली असता, पवारांनी आपल्या खास शैलीत त्यावर टिप्पणी केली. त्याचवेळी, ‘कुस्ती खेळणाऱ्यांचे कपडे सांभाळण्यापेक्षा निवडणुकीच्या रिंगणात उतरून स्वत: कुस्ती खेळावी मगच निवडणुकीबाबत भाष्य करावे,’ असा सल्लाही उद्धव ठाकरे यांना दिला.
खासदार राजू शेट्टी महायुतीत सहभागी झाल्याने सत्ताधारी आघाडीला फटका बसेल का, या प्रश्नावर राज्यात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आणखी एक आघाडी अस्तित्वात आहे. त्या आघाडीत २३ एवढी पक्षांची संख्याही लक्षणीय आहे. अशा महायुतीचा महापरिणाम मात्र निवडणुकीत जाणवत नाही, असा टोमणाही त्यांनी युतीच्या नेत्यांना मारला.

राहुल गांधी यांचे जर-तर
काँग्रेसच्या निवडून आलेल्या खासदारांनी निवड केल्यास पंतप्रधानपद स्वीकारू, असे विधान राहुल गांधी यांनी केले आहे. अशा ‘जर-तर’वर भाष्य करण्याची आपल्याला आवश्यकता वाटत नाही. तसेच काँग्रेस पक्षाकडून कधीच पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करण्याची परंपरा नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.