निश्चलनीकरणावर राष्ट्रवादीची भूमिका बदलली

हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार करण्याच्या निर्णयाचे सर्वात आधी राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वागत करण्यात आले होते. पण पैसे मिळण्यासाठी जनतेत वाढत चाललेला असंतोष बघून राष्ट्रवादीने भूमिका बदलत सरकारच्या निर्णयावर टीका सुरू केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार करण्याचा निर्णय जाहीर केल्यावर लगेचच राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी या निर्णयाचे स्वागत केले. काळा पैसा बाहेर येण्यास मदत होईल, असा विश्वासही व्यक्त केला. भाजपचा मित्रपक्ष शिवसेना, काँग्रेस, मनसे, डावे पक्ष सारेच नोटा रद्द करण्याच्या निर्णयावर टीका करीत असताना राष्ट्रवादीने मात्र समर्थन केले होते. नोटा रद्द करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादीत जितेंद्र आव्हाड यांनी पहिल्यांदा आवाज उठविला. यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी बुधवारी राज्यसभेत सरकारच्या निर्णयावर टीका केली.

पवारांचे मौन

राज्यसभेत बुधवारी झालेल्या चर्चेत शरद यादव, आनंद शर्मा, मायावती, सीताराम येचुरी, रामगोपाळ यादव यांच्यासारख्या दिग्गजांनी निश्चलनीकरणाच्या निर्णयावर सडकून टीका केली. येचुरी यांनी त्यांच्या भाषणात शरद पवार यांचा उल्लेखही केला. पण राष्ट्रवादीच्या वतीने प्रफुल्ल पटेल यांनी किल्ला लढविला. शरद पवार यांनी या महत्त्वाच्या विषयावरील चर्चेत भाग घेतला नाही. प्रफुल्ल पटेल यांनी मात्र या निर्णयाने सामान्य जनतेला पैशांसाठी होणाऱ्या त्रासाबद्दल लक्ष वेधले. बँकांमध्ये पैसे उपलब्ध करून सरकारने जनतेला दिलासा देण्याची मागणीही त्यांनी केली. जिल्हा बँकांवर घालण्यात आलेल्या र्निबधाबद्दलही पटेल यांनी नापसंती व्यक्त केली होती.

जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये नोटा बदलून देण्यास घालण्यात आलेल्या बंदीबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरुवारी प्रश्नचिन्ह निर्माण केले. केंद्राच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील जनतेचे हाल होत आहेत. नोटा बंदीच्या निर्णयानंतर केंद्र सरकारकडून दररोज तुघलकी निर्णय जाहीर केले जात असल्याची टीकाही मलिक यांनी केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार राजी नाही, पण उद्योगपतींचे कर्ज माफ केले जाते, याबद्दलही राष्ट्रवादीने टीकेचा सूर लावला.