19 December 2018

News Flash

भाजपविरोधात राष्ट्रवादीचा हल्लाबोल

सत्कार समारंभाला मुख्यमंत्र्यांना बोलाविणार नाही

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

सत्कार समारंभाला मुख्यमंत्र्यांना बोलाविणार नाही

शरद पवार, सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील या नेत्यांच्या सत्कार समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच आवश्यकता का भासते, अशी टीका सुरू झाल्याच्या पाश्र्वभूमीवर पुढील निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या समारंभांना मुख्यमंत्र्यांना निमंत्रित केले जाणार नाही, असे पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. तसेच २५ नोव्हेंबरपासून भाजप सरकारच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी आणि भाजपमधील संबंधांबाबत नेहमी चर्चा होत असते. त्यातच अलीकडे शरद पवार, तटकरे वा वळसे-पाटील यांच्या सत्कार समारंभांना मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्यात आले होते. शरद पवार यांच्या अमरावतीमध्ये झालेल्या सत्कार समारंभात मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वार्थी मित्रापेक्षा दिलदार शत्रू परवडला, असे विधान केल्याने भाजपला राष्ट्रवादी अधिक जवळचा अशी टीका सुरू झाली.

राष्ट्रवादीबद्दल होणाऱ्या या संभ्रमामुळे पक्षाच्या विश्वासहर्तेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. यामुळेच अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत भाजप सरकारवर हल्ला चढविला. भाजप नेते किंवा मुख्यमंत्री फडणवीस यांना पक्षाच्या नेत्यांचे सत्कार वा अन्य समारंभात निमंत्रित केले जाणार नाही, असे पवार यांनी सांगितले. पण महाराष्ट्रातील संस्कृती वेगळी असून, बिगर राजकीय कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या पक्षांचे नेते एकत्र येतात अशी पुस्ती अजितदादा यांनी जोडली.

कर्जमाफी फसली..

शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्णपणे फसली असून, शेतकऱ्यांच्या तोंडाला भाजप सरकारने पाने पुसली आहेत. २५ नोव्हेंबरपर्यंत सर्व शेतकऱ्यांचे कर्जमाफ होऊ शकणार नाही. यामुळेच यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनापासून म्हणजेच २५ नोव्हेंबरपासून राज्यभर हल्लाबोल आंदोलन पक्षाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केले. शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झालेल्या यवतमाळ जिल्ह्य़ातून १ डिसेंबरपासून दिंडी काढण्यात येणार असून, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच ११ डिसेंबरला नागपूरमध्ये पोहचेल. या पदयात्रेत अजितदादा , तटकरे, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आदी सहभागी होणार आहेत.

First Published on November 15, 2017 1:31 am

Web Title: ncp comment on bjp 4