राष्ट्रवादी काँग्रेसने थेट उत्तर टाळले

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर विरोधी पक्षांचा कोण चेहरा असेल, या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डी.पी. त्रिपाठी यांनी, गोलगोल उत्तर देत, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव घेण्याचे खुबीने टाळले; किंबहुना काही राज्यांमधील लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये  भाजपचा पराभव झाला, त्या वेळी विरोधी पक्षांचा कोणता चेहरा होता, असा उलट सवाल त्यांनी केला.

लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षांची एकजूट होत आहे, असे त्रिपाठी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मुद्दय़ांवर आधारित ही एकजूट असेल, असे ते म्हणाले. निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांची एकजूट करण्याचा प्रयत्न आहे, परंतु नरेंद्र मोदी यांच्यासमोर विरोधी पक्षांचा कोणता चेहरा असेल, असे विचारले असता, त्यावर थेट उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. मात्र २६ जानेवारीला मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संविधान बचाव मार्चच्या निमित्ताने सर्व विरोधी पक्षांना एकत्र केले, त्याचा उल्लेख त्यांनी केला.

शिवसेनेचा धोका नाही

महाराष्ट्रात भाजप व शिवसेनेत राजकीय वर्चस्वासाठी सतत संघर्ष सुरू आहे. भाजपविरोधात एकच आघाडी करण्यासाठी महाराष्ट्रात शिवसेनेला सोबत घेणार का, असे विचारले असता, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही, असे असू शकत नाही, असे त्रिपाठी म्हणाले; परंतु शिवसेना हा महाराष्ट्रापुरता सीमित पक्ष आहे, त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर धर्मनिरपेक्षतेला त्यांचा धोका नाही, असे सूचक उत्तर त्यांनी दिले.