केंद्रीय मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या सहभागाबाबत चर्चा सुरू असली तरी राष्ट्रवादीने भाजपबरोबर हातमिळवणी करण्याची शक्यता फेटाळली आहे. काँग्रेसबरोबरच आघाडी करू, असे संकेतही देण्यात आले आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार अपेक्षित आहे. या विस्तारात राष्ट्रवादीला संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यातून राष्ट्रवादीबद्दल संशयाचे वातावरण तयार झाले होते. पण केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होण्याची शक्यता राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी फेटाळून लावली. असा अंदाज बांधण्याकरिता कोणतेही सबळ कारण नाही, असेही पटेल यांनी म्हटले आहे. पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही भाजपबरोबर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगत राष्ट्रवादीची भूमिका काँग्रेसबरोबर राहण्याचीच आहे, असेही स्पष्ट केले आहे.

प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांनी भाजपबरोबर हातमिळवणी करण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि अण्णा द्रमुक हे भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसबाबतही चर्चा सुरू झाली होती.

गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपला अनुकूल अशी घेतलेली भूमिका किंवा विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीला शरद पवार यांनी मारलेली दांडी यामुळे राष्ट्रवादीबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाली. राष्ट्रवादीचे नेतृत्व आणि काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या कटुतेच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीला भाजपशी जवळीक अधिक सोयीचे वाटू शकते, अशी चर्चा सुरू झाली होती.

राष्ट्रवादीबद्दल काहीही चर्चा सुरू असली तरी शरद पवार यांच्या राजकारणाचा इतिहास लक्षात घेता ते कदापिही भाजपबरोबर युती किंवा बरोबर जाण्याची भूमिका घेणार नाहीत, असे मत पवारांचे जुने स्नेही आणि काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी व्यक्त केले.

तेव्हा आणि आता..

शरद पवार यांनी समाजवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला होता तेव्हाही काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता फेटाळली होती. पण १९८६ मध्ये काँग्रेसमध्ये समाजवादी काँग्रेसचे विलीनीकरण केले होते. हा पूर्वानुभव लक्षात घेता कसलीही शक्यता नाकारता येत नाही, अशी मल्लीनाथी भाजपच्या गोटतून व्यक्त करण्यात येते.