आठवडाभरात भूमिका कशी बदलली; अशोक चव्हाण यांचा सवाल
काँग्रेसची अवस्था सध्या बुडत्या जहाजाप्रमाणे झाल्यानेच विविध राज्यांमधील नेते पक्षाला रामराम करू लागले असतानाच, राष्ट्रवादीनेही काँग्रेसपासून चार हात दूर राहणेच पसंत केले आहे. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पक्षाध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसवर आगपाखड केल्याने राष्ट्रवादीला सध्या तरी काँग्रेसची साथ नकोशी वाटत असावी. आठवडाभरापूर्वी विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मदत घेणाऱ्या राष्ट्रवादीने आपला स्वार्थ साध्य झाल्यावर काँग्रेसला दूषणे देण्यास सुरुवात केल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.
पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी प्रथमच गेल्या निवडणुकीतील पराभवाचे सारे खापर काँग्रेसवर फोडले आहे. काँग्रेसबरोबर आघाडी होईल या भ्रमात राहू नका, आपण आपली शक्ती वाढविली पाहिजे, असे मत प्रफुल्ल पटेल यांनी मांडले आहे. पवार आणि पटेल या दोघांनीही काँग्रेसच्या विरोधात भूमिका मांडल्याने राष्ट्रवादीला काँग्रेसची आघाडी किंवा साथ नको, असा अर्थ काढला जात आहे. काँग्रेसची अवस्था सध्या गंभीर आहे. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीने काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेतली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यातील विधाने तसेच काँग्रेस या दोघांवरही पवार यांनी टीका करून दोन्ही पक्षांपासून समान अंतर ठेवल्याचे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे. पवारांच्या विनंतीवरूनच काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यातील नेत्यांचा विरोध डावलून राष्ट्रवादीला दोन जागांवर मदत केली. राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार निवडून आल्यावर मात्र राष्ट्रवादीने काँग्रेसच्या विरोधात भूमिका मांडली.

‘आठवडाभरात कसा बदल’
विधान परिषदेच्या ठाणे प्राधिकारी मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत डावखरे यांच्या प्रचारार्थ सभेत शरद पवार यांनी काँग्रेसची बाजू उचलून धरली होती. ठाण्यानंतर आठवडाभरानंतर मुंबईत असा कोणता फरक पडला, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे. आघाडी कोणी मोडली हे सारे जनतेसमोर आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले. आघाडी तोडण्याचे खापर काँग्रेसवर फोडले जाते, पण आघाडी राष्ट्रवादीने तोडली होती याचा पुनरुच्चार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

राष्ट्रवादीच्या नेत्यांना सचिन अहिर यांचा घरचा अहेर
मुंबई: आपापल्या प्रभागांमध्ये तरी पक्षाच्या उमेदवारांना मते मिळतील अशी खबरदारी तरी पक्षाच्या खासदार-आमदारांनी घ्यावी, असे सांगत मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी पक्षाच्या नेत्यांनाच घरचा अहेर दिल्याचे मानले जाते. मुंबईत राष्ट्रवादी वाढत नसल्याने पक्षाच्या नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जाते. मुंबईत संघटना मजबूत करण्याची जबाबदारी पुन्हा एकदा सचिन अहिर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. यापूर्वी अध्यक्ष असताना अहिर यांच्या कारकिर्दीत पक्ष बाळसे धरू शकला नव्हता. या वेळी मात्र अहिर यांनी सारी ताकद पणाला लावली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि सचिन अहिर हे सातत्याने महापालिकेती सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतात. अहिर यांनी विविध आंदोलने सुरू केली असून, आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळवून द्यायचे, असा चंग बांधला आहे. पक्षाच्या वर्धापनदिनीअहिर यांनी मुंबईत राहणाऱ्या पक्षाच्या खासदार-आमदारांना लक्ष्य केले. खासदार, आमदार आपापल्या प्रभागांमध्ये लक्ष देत नाहीत वा कार्यकर्त्यांना विश्वासातही घेत नाहीत. आपण राज्याचे नेते असल्याचे सांगून मुंबईतील जबाबदारी टाळतात, असा टोलाही अहिर यांनी पक्षाच्या नेत्यांना लगावला. विशेष म्हणजे सचिन अहिर यांनी पक्ष वाढीसाठी सुरू केलेल्या प्रयत्नांचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी कौतुक केले.