पंकजांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरसंधान
मृणालताई गोरे किंवा अहिल्याबाई रांगणेकर यांचा मुंबईकर ‘पाणीवाली बाई’ म्हणून गौरव करायचे. दुष्काळातही दारू कारखान्यासाठी पाणी मिळावे म्हणून आग्रह धरणाऱ्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची ‘दारुवाली बाई’ म्हणून ओळख झाल्याची बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी केली आहे.
पंकजा मुंडे यांच्या पतीच्या मालकीचा दारूचा कारखाना असल्यानेच त्या कारखान्यांना पाणी मिळावे म्हणून आग्रही होत्या याचा पुनरुच्चार राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला. विनोद तावडे यांच्यापाठोपाठ पंकजा मुंडे यांच्याकडेही कंपनी संचालकपदाचे एकापेक्षा जास्त क्रमांक असल्याचा आरोप करताना या संदर्भातील कागदपत्रेही त्यांनी सादर केली.
कंपनीच्या संचालक मंडळावर पंकजा पालवे असा उल्लेख आहे. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज पंकजा मुंडे या नावाने भरला होता. त्यांचे पती अमित व चारुदत्त अशी दोन नावे धारण करतात. पती-पत्नीच्या नावांबाबतचा मामला संशयास्पद असून, पंकजा मुंडे यांनीच स्पष्टीकरण करावे, अशी मागणी मलिक यांनी केली.

‘डाळीपाठोपाठ घरांच्या घोटाळ्यात बापट ’
तुरडाळीचे भाव गगनाला भिडले असताना सामान्य जतनेता दिलासा देण्याऐवजी अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी व्यापाऱ्यांना मदत होईल अशी कृती केली होती. तुरडाळींपाठोपाठ चणाडाळ, मसूर आदींचे भाव वाढले आहेत. पण बापट हे पुण्यातील स्वस्त घरांच्या वादग्रस्त योजनेत अधिक रस घेत होते, असा आरोपही मलिक यांनी केला. पाच लाखांत घर बांधून देणे शक्य आहे. पण दोन लाख रुपयांचे केंद्राचे अनुदान मिळविण्याचा डाव होता व त्यात बापट यांचाही सहभाग होता, असेही मलिक म्हणाले.