स्वाभिमानाच्या गप्पा मारणाऱ्या शिवसेनेने सत्तेत राहून भाजपवर सातत्याने कुरघोडी करण्याचा प्रयत्न म्हणजे दुटप्पीपणा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी केला. आता कुठे गेला स्वाभिमान, असा सवालही शिवसेनेला केला आहे.
सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसणारे वडिलांचा एकेही उल्लेख करू लागले आहेत. सत्तेत राहून शिव्या देणे म्हणजे दुटप्पीपणाचे लक्षण आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच पेरणीकरिता मोफत बि-बियाणे आणि खते उपलब्ध व्हावीत या मागणीकरिता तटकरे आणि धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी भेट घेतली. शेतकऱ्यांना १५ दिवसांमध्ये साऱ्या सवलती तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ केले जावे. अन्यथा सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तटकरे यांनी दिला.
खतांच्या किमतीत वाढ झाल्याबद्दल तटकरे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे.