सोनू, तुझा मायावर भरवसा नाय का? हे गाणं आता विधानभवनाच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचलं आहे. याच गाण्याचा आधार घेत विरोधी पक्षांच्या आमदारांनी भाजप-शिवसेना युती सरकारला लक्ष्य केलं. घोटाळ्यांचे आरोप झालेले गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली.

 

भाजप नेते आणि गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावरील एसआरए घोटाळ्याच्या आरोपानंतर विरोधकांनी विधीमंडळ अधिवेशनात सरकारची कोंडी केली आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात असतानाच आता उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावरही भूखंड घोटाळ्याचा आरोप झाला आहे. शिवसेनेच्या जवळच्या बांधकाम व्यावसायिकाला लाभ मिळावा यासाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मॅग्नेटिक महाराष्ट्रासाठी संपादित केलेल्या ६०० एकर आरक्षित भूखंडातून ४०० एकर जमीन वगळल्याचा आरोप सुभाष देसाईंवर करण्यात आला आहे. त्यामुळं मेहता आणि सुभाष देसाई यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी विधानसभेत केली. देसाई यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असले तरी विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. अखेर गोंधळातच विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर विधानसभेच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘सोनू, तुझा सरकारवर भरवसा नाय का?’ असं गाणं गात सरकारला लक्ष्य केलं.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीमधील गोंदेदुमाला येथे एमआयडीसीने संपादीत केलेली ४०० एकर जमीन सुभाष देसाई यांनी मूळ मालकाला परत केली. त्यामुळे देसाई यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.