काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांना विधान परिषदेच्या सभापतीपदावरुन हटविण्याच्या यशस्वी खेळीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या पंधरा वर्षांमधील एमएमएमआरडीएच्या प्रकल्पांच्या किंमती कशा वाढल्या, याची चौकशी करुन त्यासंबंधीची श्वेतत्रिका काढावी, अशी मागणी करीत पुन्हा काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.  
विशेष म्हणजे सिंचन घोटाळ्याच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीच ही मागणी गुरुवारी विधान परिषदेत केली. एमएमआरडीमार्फत रिलायन्स इन्फ्रा कंपनीला मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम देण्यात आले. त्यासंदर्भात झालेले करार आणि मेट्रो तिकिट दरवाढीचे निमित्त करुन राष्ट्रवादीने काँग्रेसवर नेम धरला. मेट्रो प्रकल्पाची मूळ किंमत किती होती व वाढलेली किंमत किती असा प्रश्न तटकरे यांनी विचारला. त्यावर नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी या प्रकल्पाची मूळ किंमत २३५६ कोटी रुपये होती, व प्रकल्प पूर्ण होताना हा आकडा ४३२१ कोटी रुपयांवर गेला, अशी माहिती दिली. त्याचा आधार घेऊन तटकरे यांनी कॉंग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
आघाडी सरकारमध्ये एकत्र असताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सिंचन क्षेत्रात गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करुन श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा केली होती. त्यावर काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात ताणावाचे वातावरण तयार झाले होते. एमएमआरडीएवर थेट मुख्यमंत्र्यांचेच नियंत्रण होते. त्यामुळेत तटकरे यांनी मेट्रो प्रकल्पाच्या किंमतीत दुपटीने झालेल्या वाढीचे व तिकिट दरवाढीचे निमित्त करुन गेल्या पंधरा वर्षांतील एमएमआरडीएच्या प्रकल्पांची मूळ किंमत किती आणि वाढलेली किंमत किती व ती का वाढली, याची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी केली.