अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर गृहखात्याची जबाबदारी दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे तशी शिफारस केली होती. ही शिफारस राज्यपालांनी मान्य केली आहे. दरम्यान गृहखात्याची जबाबदारी मिळाल्यानंतर दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर पोहोचले होते. यावेळी इतर नेतेही उपस्थित होते. या बैठकीनंतर दिलीप वळसे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीत दिलीप वळसे पाटील यांनी हजेरी लावली होती. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “जबाबदारी मोठी आहे आणि ती पार पाडण्यास मला निश्चित आवडेल. मी दुपारी १.३० वाजल्यानतंर मंत्रालयात येऊन पदभार स्वीकारणार आहे”.

अनिल देशमुख पायउतार

यावेळी त्यांना शरद पवारांसोबत काय चर्चा झाली असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली असून मार्गदर्शन घेतलं आहे”.. दरम्यान दिलीप वळसे पाटील यांच्याकडील कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, तर उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी सोमवारी राज्याच्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. देशमुख हे पदावर कायम राहिल्यास भाजपला टीकेची आयती संधी मिळाली असती. यामुळेच देशमुख यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर देशमुख यांनी स्वत:च राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याला पवारांनी संमती दिल्याचे पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर स्फोटके असलेली गाडी आढळणे आणि या गाडी मालकाचा गूढ मृत्यू यावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली. हे प्रकरण योग्यपणे हाताळण्यात न आल्यानेच तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली होती. या बदलीनंतर देशमुख यांनी परमबीर सिंह यांच्यावर परिस्थिती योग्यपणे हाताळली नाही, असा ठपका ठेवला होता. या आरोपानंतरच परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचा आरोप केला होता. या आरोपानंतर सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशमुख यांची पाठराखण केली होती. भाजपने केलेल्या आरोपानंतरही पवारांनी देशमुख यांची बाजू उचलून धरली होती. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर देशमुख यांची गच्छंती अटळ ठरली.

सर्वोच्च न्यायालयात आव्हान
सीबीआय चौकशीच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला अनिल देशमुख व राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी हे अनिल देशमुख यांची तर कपिल सिब्बल हे राज्य सरकारची बाजू मांडणार असल्याचे समजते. उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रत उपलब्ध झाल्यावर देशमुख हे तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांनी ज्येष्ठ वकील सिंघवी यांच्याशी चर्चा केली.