News Flash

भाजपच्या खेळीने राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत.

संग्रहित छायाचित्र

पुरेसे संख्याबळ नसतानाही धाडस; राज्यसभा बिनविरोध

पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसे संख्याबळ नसताना भाजपने सहा अधिकृत उमेदवार उभे करतानाच एका अपक्षाला पुरस्कृत केल्याने विधान परिषदेच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. भाजपच्या या खेळीने राष्ट्रवादीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. प्रत्यक्ष मतदान झाल्यास राष्ट्रवादी की भाजप, कोणाचा उमेदवार पराभूत होईल याची चर्चा सुरू झाली आहे. राज्यसभेची निवडणूक मात्र अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली आहे.

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. राज्यसभेसाठी सहाच उमेदवारी अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. युतीचे सात आणि आघाडीचे तीन असे उमेदवार उभे करून निवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवडय़ात मांडली होती. प्रत्यक्षात भाजपने सहा उमेदवार रिंगणात उतरविले असून, मुंबई महापालिकेतील भाजपचे गटनेते मनोज कोटक यांचा अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवापर्यंत असून, त्यात एका उमेदवाराचा अर्ज मागे घेऊन निवडणूक घेण्याकडे भाजपचा कल दिसत आहे. एकूण २८८ आमदारांपैकी छगन भुजबळ आणि रमेश कदम हे दोन आमदार अटकेत असल्याने ते मतदानाला येऊ शकतील का, याबाबत साशंकता आहे. तसे झाल्यास पहिल्या पसंतीच्या २६.०१ मतांची विजयासाठी आवश्यकता आहे. भाजपचे संख्याबळ १२२ असून, पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठीच भाजपला नऊ मतांची आवश्यकता आहे. सहावा किंवा पुरस्कृत अपक्षाला रिंगणात ठेवल्यास भाजपला अतिरिक्त मते कुठून मिळणार, असा प्रश्न आहे.

विजयाचे गणित जुळविण्याचा भाजपचा प्रयत्न

राष्ट्रवादीचा दुसरा उमेदवार निवडून येण्यासाठी काँग्रेसच्या मतांची आवश्यकता आहे. दिल्लीच्या पातळीवर दोन जागांवर राष्ट्रवादीला पाठिंबा देण्यात आला असला तरी राज्यातील काँग्रेस नेत्यांना राष्ट्रवादीला झुकते माप देणे पसंत पडलेले नाही. या पाश्र्वभूमीवर शिवसेनेकडील अतिरिक्त मते किंवा शिवसेनेची दुसऱ्या पसंतीची मते, काँग्रेसमधील काही नाराजांची मते व छोटय़ा पक्षांच्या साहाय्याने सहाव्या उमेदवाराच्या विजयाचे गणित जुळविण्याचा भाजपचा प्रयत्न असू शकतो. तसे झाल्यास राष्ट्रवादीचा दुसरा उमेदवार अडचणीत येऊ शकतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊ नये, हे भाजप आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे उद्दिष्ट आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीत संशयाचे वातावरण तयार करण्यासाठीच ही खेळी केल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात येत होते. काँग्रेसची काही मते आम्हाला मिळतील, अशी कुजबूज भाजपच्या गोटातून सुरू झाली होती. भाजपने कितीही दावे केले तरी आघाडीत ठरल्याप्रमाणे काँग्रेसची अतिरिक्त मते राष्ट्रवादीकडे हस्तांतरित केली जातील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी स्पष्ट केले.

राज्यसभेचे उमेदवार –

पीयूष गोयल, विनय सहस्रबुद्धे, डॉ. विवेक महात्मे (भाजप), प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी), पी. चिदम्बरम (काँग्रेस) व संजय राऊत (शिवसेना). सहा जागांसाठी सहाच अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.

विधान परिषदेचे उमेदवार- (एकूण जागा- १०, उमेदवार- १२)

सुरजित ठाकूर, विनायक मेटे, सदाभाऊ खोत, प्रवीण दरेकर, आर. एन. सिंग, प्रसाद लाड (भाजप), मुंबई महापालिकेतील भाजपचे गटनेते मनोज कोटक (अपक्ष), सुभाष देसाई व दिवाकर रावते (शिवसेना), रामराजे नाईक-निंबाळकर व धनंजय मुंडे (राष्ट्रवादी), नारायण राणे (काँग्रेस).

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2016 3:28 am

Web Title: ncp discomfort due to bjp plan
टॅग : Ncp
Next Stories
1 कोकण विभागीय आयुक्तपदी प्रभाकर देशमुख
2 अन्न व नागरी पुरवठामंत्र्यांच्या बदल्यांच्या अधिकारांना कात्री
3 राज्य कामगार विमा योजनेची रुग्णालये अधांतरी!
Just Now!
X