पर्युषण काळात चार दिवस मांसविक्री बंदी करणाऱ्या भाजप आणि पालिका आयुक्तांचा निषेध करण्यासाठी मुंबई राष्ट्रवादी काँग्रस अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी कोंबडय़ा आणि मासळी घेऊन पालिका मुख्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण सुरक्षारक्षकांनी मुख्यालयात कोंबडय़ा घेऊन जाण्यास मनाई केल्यामुळे अखेर राष्ट्रवादीने उपमहापौर आणि पालिका आयुक्तांना सुके बोंबील भेट देत मांसविक्री बंदीचा निषेध केला.

पर्युषण काळामध्ये १०, १३, १७ आणि १८ सप्टेंबर रोजी देवनार पशुवधगृह बंद ठेवण्याचे, तसेच पालिकेच्या मंडयांमध्ये मांसविक्रीस बंदी करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.या मांसविक्री बंदीला छुपा पाठिंबा असलेल्या भाजप आणि पालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर आणि पालिकेतील गटनेते धनंजय पिसाळ यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक कोंबडय़ा आणि मासळी घेऊन पालिका मुख्यालयाबाहेर दुपारी अवतरले. प्रवेशद्वारावर त्यांना अटकाव झाला. राष्ट्रवादीचे नगरसेवक सोबत सुके बोंबील घेऊन उपमहापौर अलका केरकर यांच्या दालनात दाखल झाले. दालनात त्या नसल्यामुळे त्यांच्या सचिवांकडे निवेदन आणि सुके बोंबील देऊन नगरसेवकांनी आपला मोर्चा आयुक्तांकडे वळविला.