प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची घोषणा; नोकरभरतीवरील निर्बंधांमुळे तरुणांमध्ये रोष

राज्य सरकारच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल यात्रेला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत असून २८ फेब्रुवारी रोजी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे मुंबईत हल्लाबोल यात्रा काढण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. त्याचबरोबर नोव्हेंबरच्या सुमारास राज्यभरातील हल्लाबोल यात्रेचा समारोप म्हणून मुंबईत एक मोठी हल्लाबोल यात्रा काढण्यात येईल, असेही तटकरे यांनी सांगितले.

उत्तर महाराष्ट्रात १५ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी या काळात हल्लाबोल यात्रा पार पडली. तरुणाई्रत सरकारविरोधात प्रचंड रोष असल्याचे हल्लाबोल यात्रेत अनुभवास आले. नोकरभरती कमी करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे तरुण चिडलेले आहेत. त्याचबरोबर शेतकरी वर्गही संतप्त आहे. हल्लाबोल यात्रेच्या काळात मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. धर्मा पाटील यांनी ज्या कारणासाठी आत्महत्या केली तो प्रश्न अद्यापही तडीस लागलेला नाही. त्यामुळे कुटुंबाने त्यांच्या अस्थींचे विसर्जन केलेले नाही, ही सरकारसाठी लाजिरवाणी बाब आहे, अशी टीका तटकरे यांनी केली.

उत्तर महाराष्ट्रातील हल्लाबोल यात्रेच्या समारोपासाठी नाशिकमध्ये १० मार्चला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची सभा होणार असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.

मॅग्नेटिक महाराष्ट्रावरही तटकरे यांनी टीकास्त्र सोडले. दोन वर्षांपूर्वीही असाच कार्यक्रम घेतला. त्यातही आठ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आल्याचा दावा केला. त्यामुळे आता फडणवीस सरकारने त्यातून नेमकी किती गुंतवणूक आली, कुठे आली, किती जणांना रोजगार मिळाला याचा तपशील जाहीर करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

विधान परिषदेसाठी दोन्ही काँग्रेस एकत्र

विधान परिषदेतील जवळपास २१ जागा तीन महिन्यांत रिक्त होत आहेत. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येणारे आमदार, पदवीधर मतदारसंघातून निवडून येणारे आमदार अशा विविध जागांचा समावेश आहे. या जागांवर होणाऱ्या निवडणुकीसाठी एकमेकांविरोधात न लढता आघाडी करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. भाजपा सरकारला या विधान परिषद निवडणुकीत यशापासून रोखण्यासाठी दोन्ही कॉंग्रेसने आघाडी केली पाहिजे, यावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकमत झाले. सध्या ज्या पक्षाकडे जी जागा आहे तीच कायम ठेवायची की आपसात बदलायची, भाजपा-शिवसेनेकडे असलेल्या जागांवर कोणी लढायचे अशा विविध मुद्दय़ांवर चर्चा करण्यासाठी व आघाडीची बोलणी करण्यासाठी बैठका सुरू ठेवण्याचेही यावेळी ठरले.