News Flash

“मी सर्व काही मुख्यमंत्र्यांना विचारुनच केलं होतं, फाईलवर त्यांची सहीपण आहे”; ‘त्या’ निर्णयावरुन आव्हाडांचा खुलासा

मी कोणतंही काम परवानगी घेतल्याशिवाय करत नाही; जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण

मी कोणतंही काम परवानगी घेतल्याशिवाय करत नाही; जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाटा रुग्णालयातील कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी म्हाडाची घरं देण्याचा निर्णय रद्द केल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेला निर्णय उद्धव ठाकरेंनी तात्काळ रद्द केला होता. शिवसेनेचे स्थानिक आमदार अजय चौधरी यांनी स्थानिकांचा विरोध असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे दिल्यानंतर स्थगितीचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारुनच सर्व प्रक्रिया राबवण्यात आली होती असं जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

“जागा द्यायच्या आहेत, कशा, कुठे आणि कोणाच्या हातातून द्यायच्या आहेत यासंबंधी मुख्यमंत्र्यांना विचारुनच केलं होतं. मुख्यमंत्र्यांची फाईलवर सही आहे. मी कोणतंही काम परवानगी घेतल्याशिवाय करत नाही,” असं जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे.

पवारांच्या उपस्थितीत झालेला निर्णय रद्द केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी काढला तोडगा; जितेंद्र आव्हाडांनी केलं जाहीर

कॅन्सर रुग्णांना बॉम्बे डाईंगमध्ये घर मिळणार –

“टाटा रुग्णालयाला आणि तिथे येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी १०० सदनिका हाजी कासम चाळीत देण्यात आल्या होत्या. पण तेथील स्थानिकांनी आक्षेप घेतल्याने आणि त्यांनी तो आक्षेप स्थानिक आमदारांकडे नोंदवल्याने आमदारांनी तो प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारी नेला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली. पण ती स्थगिती देतानाच कॅबिनेटच्या आधी मुख्यमंत्र्यांनी मला बोलावून घेतलं आणि त्याच परिसरात जागा शोध आणि ताबडतोब त्याबाबत कारवाई करा असं सांगितलं,” अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “आम्ही शोध घेतला असता १०० जागा बॉम्बे डाईंगमध्ये असणाऱ्या २२ इमारतींमध्ये आहे. त्यामुळे आम्हाला आता १०० जागा टाटा हॉस्पिटलला बॉम्बे डाईंगमध्ये देता येतील असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी दिला असून आम्ही त्याचं स्वागत करतो”.

“शरद पवारांच्या उपस्थितीत झालेला निर्णय रद्द; आपणच बॉस असल्याचं मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिलं”

मुख्यममंत्र्यांबोत दुरावा?

दरम्यान यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि आमच्यात कोणताही दुरावा झाला नसल्याचं सांगितलं. “स्थानिक लोक, आमदारांनी घेतलेल्या आक्षेपामुळेच हा निर्णय घेण्यात आला होता. आता त्यांनी तेथील स्थानिक आमदार, सचिवांशी चर्चा करत जागा शोधण्याचे आदेश दिले होते. जागा शोधून लगेच निर्णयही घेण्यात आला,” असं आव्हाडांनी यावेळी सांगितलं. तसंच हाजी कासम चाळीमधील जागा राखीव ठेवून बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी कदाचित वापर करु अशी माहिती त्यांनी दिली.

विसंवाद नाही

२८८ पैकी माझ्यावर वैयक्तिक राग असलेला एकही आमदार नाही असं सागताना जितेंद्र आव्हाड यांनी विसंवाद असता तर २४ तासांच्या आत निर्णय झाला नसता. निर्णय फिरवला गेला असला तरी त्याच तत्परतने जवळजवळ एक कमीच्या अंतरावर आला असल्याचं त्यांनी सांगितलं.

“मला आनंद आहे की, काल मिळालेल्या स्थगितीवर लगेच निर्णय झाला असून परत तेवढ्याच जागा, तेवढ्याच जवळ, चांगल्या परिसरात कॅन्सर रुग्णांना देऊ शकलो,” असंही ते म्हणाले.

काय आहे प्रकरण –

मुंबई शहरात कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांची व काळजीवाहू व्यक्तींच्या निवासाची सोय करता यावी या उद्देशाने टाटा मेमोरियल रुग्णालयाला १०० सदनिका हस्तांतरित करण्याच्या म्हाडाच्या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी स्थगिती दिली. तसंच याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिवांना दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते सदनिका हस्तांतरणाच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यानी स्थगिती दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं.

टाटा मेमोरियल रुग्णालयात देशभरातून रुग्ण येत असतात. सोबतच त्यांचे नातेवाईक व काळजीवाहू व्यक्ती येतात; परंतु त्यांच्या राहण्याची व्यवस्था नसल्याने किंवा खासगी निवासस्थानाची सोय असलेले ठिकाण परवडत नसल्याने बरेचदा नातेवाईकांना पदपथावर राहावे लागत असल्याने त्यांची गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी परळ शिवडी विभागातील करीरोड येथील हाजी कासम चाळीच्या पुनर्विकासातून मिळालेल्या सदनिकांपैकी ३०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या १०० सदनिका टाटा मेमोरियल रुग्णालयास नाममात्र दराने (१ रुपया प्रति वर्ष) देण्याचा निर्णय गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घेतला होता.

शिवसेना आमदार चौधरींच्या पत्रावर पासून अहवाल सादर करावा, तोपर्यंत स्थगिती देण्यात येण्यात येत आहे’ असे आदेश मुख्यमंत्र्यांनी गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिवांना दिले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 5:22 pm

Web Title: ncp jitendra awhad on cm uddhav thackeray stay decision over mhada house allotment to cancer patients families sgy 87
Next Stories
1 “..मग आमचे उमेदवार हरले तरी पर्वा नाही”, जि.प. पोटनिवडणुकांवरून फडणवीसांचा सरकारला इशारा!
2 महापालिकेच्या बजेटमधील १,२०६ कोटी कोण खातंय?; राजावाडीतील प्रकरणावरून शेलारांचा सवाल
3 कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांना बॉम्बे डाईंगमध्ये घरं मिळणार – जितेंद्र आव्हाड
Just Now!
X