News Flash

“ही दुर्दैवाची बाब”, मुख्यमंत्र्यांनी ‘तो’ निर्णय स्थगित केल्यानंतर आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया!

जितेंद्र आव्हाडांनी घेतलेल्या कॅन्सरग्रस्तांच्या नातेवाईकांना घरं देण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. त्यावर आव्हाडांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांची उद्धव ठाकरेंच्या निर्णयावर नाराजी!

राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेला एक निर्णय मुख्यमंत्र्यांनी स्थगित केला आणि त्यावर विरोधकांकडून निशाणा साधला जाऊ लागला. जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेला निर्णय मुख्यमंत्र्यांनी स्थगित केल्यामुळे त्याला सत्ताधाऱ्यांमध्ये विसंवाद असल्याचं स्वरूप दिलं जाऊ लागलं. या पार्श्वभूमीवर आता खुद्द जितेंद्र आव्हाड यांनीच या वादावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “त्या ठिकाणी कॅन्सरग्रस्त रुग्ण राहणार असल्याचं मत पूर्णपणे चुकीचं आहे”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. त्यामुळे आता नेमकं कॅन्सरग्रस्तांच्या नातेवाईकांसाठीच्या घरांचं काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

काय होता निर्णय?

मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयात राज्यभरातून आणि देशभरातून मोठ्या संख्येनं रुग्ण कर्करोगावर उपचार करून घेण्यासाठी येत असतात. या रुग्णांसोबतच त्यांचे नातेवाईक देखील रुग्णालयात येतात. कर्करोगावरचे उपचार दीर्घकाळ चालत असल्यामुळे या नातेवाईकांची राहण्याची अडचण निर्माण होते. अनेकदा हे नातेवाईक रुग्णालय आवारत, रस्त्याच्या कडेला, फुटपाथवर राहतात. या पार्श्वभूमीवर या नातेवाईकांना राहण्यासाठी म्हाडाच्या शिवडीतील विघ्नहर्ता आणि सुखकर्ता या पुनर्विकसित इमारतींमधील १०० सदनिका देण्याचा निर्णय जितेंद्र आव्हाड यांनी घेतला होता. यानंतर या सदनिका टाटा रुग्णालयाकडे हस्तांतरीत देखील करण्यात आल्या होत्या. मात्र, अंमलबजावणीनंतर त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली होती.

काय म्हणाले आव्हाड?

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कोणताही कॅन्सरचा पेशंट तिथे राहणार नाही. रुग्ण टाटामध्ये दाखल झाल्यानंतर दोन-तीन महिने उपचार चालतात. त्याचे नातेवाईक तिथे येत असतात. ते ज्या अवस्थेत राहतात, ती अवस्था माणुसकीला धरून नाही. म्हणून त्यांना आपण घरं दिली, तर आपल्याकडून एक मानवी सेवा होईल, या दृष्टीने तो प्रयत्न होता. कॅन्सरचे पेशंट तिथे राहतील, हे मत पूर्णपणे चुकीचं आहे. यामध्ये माझा कुठलाही स्वार्थ नाही. बाहेर गावाहून येणाऱ्या कॅन्सरच्या रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय व्हावी, या एकाच उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला होता. पण या निर्णयाला स्थगिती येणं ही दुर्देवाची बाब आहे”, असं आव्हाड म्हणाले आहेत.

सदनिका देण्यावर आक्षेप का?

शिवडीतील शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांना तक्रार केल्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. “जितेंद्र आव्हाडांनी माझी दखल घेतली नाही. माझी दखल न घेतल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जावं लागलं. जितेंद्र आव्हाड यांना दोन पत्रं लिहिली पण दखल घेतली नाही. माझ्याकडे कागदोपत्री पुरावे आहेत. माझ्या मतदार संघातील सुखकर्ता आणि विघ्नहर्ता या पुनर्विकसीत इमारतींमध्ये ७०० मराठी कुटुंब राहतात. येथील १०० सदनिका कर्करूग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी देण्याच्या म्हाडाच्या निर्णयामुळे या रहिवाशामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे”, अशी भूमिका आमदार चौधरी यांनी मांडली आहे.

“आव्हाडांकडे पाठपुरावा केला, पण मुख्यमंत्र्यांकडे जाईपर्यंत दखल घेतली नाही”

दरम्यान, शिवडीतील म्हाडा वसाहतीतीत सदनिकांऐवजी भोईवाडा येथील वसाहतीतील सदनिका कर्करोगग्रस्तांच्या नातेवाईकांना देण्यात याव्यात, अशी देखील पुस्ती आमदार चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात जोडली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 2:29 pm

Web Title: ncp jitendra awhad on cm uddhav thackeray stay in mhada house to cancer patients relatives in sewri pmw 88
Next Stories
1 ‘आशा’ सेविकांना मानधनवाढ आणि कोविड भत्ता मिळणार; आरोग्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर संप मागे!
2 “आव्हाडांकडे पाठपुरावा केला, पण मुख्यमंत्र्यांकडे जाईपर्यंत दखल घेतली नाही”
3 ओबीसी आरक्षणाशिवाय पोटनिवडणुका; भुजबळांचा सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा
Just Now!
X