सिंचन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील सिंचन घोटाळ्याची चौकशी करत असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) अंमलबजावणी महासंचालनालयाने (इडी) यासंबंधीचे कागदपत्रे सादर करण्यास सांगितल्याचे वृत्त ‘टाइम्स नाऊ’ने दिले आहे. सत्तेवर असताना अजित पवार आणि तत्कालीन मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला होता. ‘इडी’कडून या घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू झाल्यास अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. परंतु, ‘इडी’कडून अधिकृतपणे अद्याप याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही.

‘एसीबी’ तपास करत असलेल्या सिंचन घोटाळ्याचा आवाका हा भारताबाहेर गेला असून काळा पैसा हवाला मार्फत परदेशात पाठवल्याचा संशय इडीला असल्याचे सांगण्यात येते. सिंचनाची कामे देताना राज प्रमोटर्स अँड सिव्हिल इंजिनिअर्स प्रा. लि. या कंपनीला झुकते माप दिल्याचा अजित पवार यांच्यावर आरोप आहे. या कंपनीशी अजित पवार यांचे हितसंबंध असल्याचाही आरोप करण्यात आला होता. तसेच कामांच्या किंमतीत नाहक वाढ करण्यात आल्याचेही म्हटले होते. यासंबंधी ‘एसीबी’ने चौकशी केली. तब्बल १२ वेळा त्यांना प्रश्नावली पाठवली होती. त्याची उत्तरेही अजित पवार यांनी वेळोवेळी दिली होती.

परंतु, शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्याबाबत सरकारने ‘टायमिंग’ साधल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.