मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असून, यापुढेही राष्ट्रवादीतच राहणार आहे. शरद पवार हेच आमचे नेते आहेत. तसेच भाजप-राष्ट्रवादी राज्यात पाच वर्षे स्थिर सरकार देईल, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्याने रविवारी राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, अजित पवारांचे वक्तव्य हे खोडसाळ आणि दिशाभूल करणारे असल्याचे प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिल्याने काका-पुतण्यात जुंपली आहे.

राष्ट्रवादीत बंड करणाऱ्या अजित पवार यांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. त्यांची मनधरणी करण्यासाठी लागोपाठ दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे नेते प्रयत्नशील होते. जयंत पाटील आणि दिलीप वळसे-पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली. पण, अजित पवार आपल्या भूमिकेपासून मागे हटण्यास तयार नाहीत. त्यामुळे ते माघार घेणार नाहीत हे स्पष्ट झाले. अजित पवारांनी सायंकाळी ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासह सर्व भाजप नेत्यांचे आभार मानले. राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी स्थिर सरकार देऊ, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.

आपण राष्ट्रवादीतच आहोत, भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार राज्याला पाच वर्षे स्थिर सरकार देईल, असा दावा अजित पवार यांनी केला. त्यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीत संभ्रमाचे वातावरण तयार झाले. अजित पवारांच्या या दाव्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीत पडद्याआड काही समझोता झाला का, असा संशय बळावला होता. पण अजित पवारांच्या ट्वीटनंतर लगेचच पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. भाजपबरोबर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शिवसेना आणि काँग्रेससह संयुक्त सरकार स्थापण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. अजित पवार यांचे विधान खोडसाळ, चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहे. त्यातून जनतेत संभ्रम निर्माण केला जात असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. तर राजीनामा देऊन परत या, असा सल्ला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांना दिला.

‘विश्वासदर्शक ठराव जिंकू’ : देवेंद्र फडणवीस सरकार विधानसभेत विश्वासदर्शक ठराव नक्कीच जिंकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला. पक्षाचे सर्व आमदार विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान करतील. राज्याला भाजप-राष्ट्रवादी पाच वर्षे स्थिर सरकार देईल, असा दावाही त्यांनी केला. भाजपशी केलेली हातमिळवणी व अन्य मुद्दय़ांवर अजितदादा लवकरच पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार आहेत.

फडणवीस-अजितदादा चर्चा

राष्ट्रवादीचे बंडखोर नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या ‘वर्षां’ या निवासस्थानी भेट घेतली. फडणवीस आणि अजित पवार यांच्यात सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीसह राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचे वृत्त आहे.