कोकणातील राष्ट्रवादीचे नेते गुहागर येथील आमदार भास्कर जाधव हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. कारण, त्यांनी काही वेळापूर्वीच मातोश्रीवर जाऊन  शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाल्याने राष्ट्रवादीला भास्कर जाधव यांच्या रूपाने आणखी एक हादरा बसतो की काय? हे पाहावे लागणार आहे. तर, शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेल्या भास्कर जाधव यांची घरवापसी होणार असल्याच्या राजकीय चर्चांनीही जोर धरला आहे. एबीपी माझाने या संदर्भात वृत्त दिले आहे.

सध्या राष्ट्रवादीतील नेते मंडळी मोठ्याप्रमाणात युतीकडे जातांना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच साताराचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर ते भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना पेव फुटले होते. तर, या अगोदर बीडचे राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ काढून हाती शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केलेला आहे.

भास्कर जाधव हे काही वर्षांपूर्वी शिवसेनेत होते. काही कारणाने त्यांनी सेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात विविध मंत्रिपदे भूषवणारे जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही होते.