आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील जे.जे. रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत अशी माहिती समजते आहे. छगन भुजबळ यांना शनिवारी पोटदुखीचा त्रास सुरु झाला. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली म्हणूनच त्यांना मुंबईतील जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले अशी माहिती मिळते आहे.

छगन भुजबळ यांच्या सिटी स्कॅन आणि सोनोग्राफीच्या चाचण्या झाल्या आहेत. भुजबळ यांच्या स्वादुपिंडाला संसर्ग झाल्याने भुजबळ यांना पोटदुखीचा त्रास होत असल्याचे चाचण्यांवरून समोर आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना श्वास घेण्यासही थोडा त्रास होतो आहे त्यामुळे भुजबळ यांना कार्डिअॅक केअर युनिटमध्ये ठेवण्यात आले आहे असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

छगन भुजबळ यांना शनिवारी पोटदुखीचा आणि श्वास घेण्यासाठीचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांना ऑर्थर रोड तुरुंगातून जे.जे. रुग्णालयात उपचारांसाठी हलविण्यात आले. सुरुवातील त्यांना अति दक्षता विभागात ठेवण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्यांना सीसीयू मध्ये हलविण्यात आले. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती समजते आहे.