आरे वसाहत वन म्हणून जाहीर करण्याची तसेच आरेतील मेट्रो-३ प्रकल्पाच्या कारशेसाठी २६४६ झाडे हटवण्यास पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने दिलेली मंजुरी अवैध ठरवून रद्द करण्याची पर्यावरणवादींची मागणी उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. त्यामुळे आरेतील मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. यावर आता सर्वच स्तरातून निरनिराळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनीदेखील सरकारवर हल्लाबोल केला आहे. आरेला नष्ट करणाऱ्या सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या निसर्गप्रेमींचा आवाज दाबण्याचं काम सरकार करत असल्याचे म्हणत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

मेट्रोच्या कारशेडसाठी आरेला नष्ट करणाऱ्या सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या निसर्गप्रेमींचा आवाज घोटण्याचं काम पोलिसांनी केलं. वृक्ष तोडीला विरोध करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. रातोरात ४०० झाडांची पोलीस पहाऱ्यात कत्तल केली. सरकार किती ‘आरे’रावी करणार? जाहीर निषेध. #AareyForest अशा आशयाचं ट्विट मुंडे यांनी केलं आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने पर्यावरण प्रेमींनी दाखल केलेल्या याचिका शुक्रवारी फेटाळल्या. न्यायालयाच्या निर्णयानंतर कारशेडच्या जागेवरील झाडे तोडायला शुक्रवारी रात्रीच सुरुवात झाली. शुक्रवारी रात्रीत जवळपास चारशेहून अधिक झाडं कापल्याची माहिती स्थानिकांनी दिली. झाडे तोडण्याचं हे काम पोलीस सुरक्षेत सुरू होतं. वृक्षतोडीची माहिती समजाताच विविध ठिकाणाहून अनेक पर्यावरणप्रेमी कारशेडच्या बाहेर विरोधासाठी जमले होते. कारशेडच्या जागी कोणालाही प्रवेश नसल्यामुळे अनेकांनी बाहेर रस्त्यावरच ठिय्या दिला. ‘आरे’मध्ये रात्रभर तणावाचं वातावरण होतं. रात्रभर पोलीस आणि आंदोलकामध्ये घमसान झालं. आंदोलन शांत करण्यासाठी आणि वृक्ष तोडीला विरोध करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तसंच शनिवारी सकाळी आरे कारशेड उभारण्यात येणाऱ्या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आलं होतं.