मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप-शिवसेनेच्या युती सरकारची ३ वर्षे निराशेची आणि पश्चात्ताप करायला लावणारी आहेत. महाराष्ट्र सरकारची असंवेदनशील कृती, चुकलेले निर्णय, फसलेले धोरण आणि अकार्यक्षमता यामुळे राज्याचा विकास खुंटला आहे, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली. मागील तीन वर्षांचा लेखाजोखा मांडणारे एक पत्रकच धनंजय मुंडे यांनी काढले अाहे. या पत्रकात राज्य सरकारच्या कारभारासोबत केंद्राच्या निर्णयावरही ताशेरे ओढण्यात आले आहेत.

राज्यातील शेतकरी, कष्टकरी, मजूर, व्यापारी,दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, युवक, महिला आणि विद्यार्थी असे सगळेच घटक या सरकारच्या कारभाराला वैतागले आहेत. तिसऱ्या वर्षपूर्तीचे सेलिब्रेशन करताना मुख्यमंत्र्यांनी संवाद साधण्याचा सावध निर्णय घेतला आहे तो जनतेचा कल जाणून घेतल्यामुळेच असेही मुंडे यांनी म्हटले.

महाराष्ट्रावरचे कर्ज ५० टक्क्यांनी वाढले

सेलिब्रेशन म्हणजे उत्सव आणि कम्युनिकेशन म्हणजे जाहिरातबाजी ही भाजपची तीन वर्षांची कामगिरी आहे. अच्छे दिनच्या थापा मारून हे सरकार सत्तेवर आले. सरकार सत्तेवर आल्यापासून विकासकामे कमी आणि जाहिरातींवर जास्त खर्च केला असाही आरोप धनंजय मुंडे यांनी केला.

३१ ऑक्टोबर २०१४ रोजी सरकारच्या शपथविधीवर जनतेच्या करातून ९८ लाखांपेक्षा जास्त खर्च करण्यात आला. तेव्हापासून सुरू असलेली उधळपट्टी अजूनही सुरूच आहे अशीही टीका मुंडे यांनी केली. सरकारच्या बेजबाबदार कारभाराची अनेक उदाहरणे समोर आली आहेत असेही मुंडे यांनी या पत्रकात म्हटले आहे.

सरकारने महागाई वाढवली

भाजपच्या सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात महागाई प्रचंड वाढली. मोदी सरकार असो किंवा राज्य सरकार जीवनावश्यक वस्तूंचे दर ५ वर्षे स्थिर ठेवू असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र केंद्र आणि राज्य सरकारला याचा सपशेल विसर पडला. पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या, स्वयंपाकाचा गॅस महाग झाला, भाज्यांचे दर कडाडले तसेच इतर अनेक जीवनाश्यक वस्तू महागल्या. महागाई वाढण्याला कारण हे सरकारचे धोरण आहे अशी टीकाही धनंजय मुंडे यांनी केली.

याशिवाय नोटाबंदी, जीएसटी यांसारखे जाचक निर्णय केंद्र सरकारने लादले आहेत. नोटाबंदीच्या निर्णयामुळे किती काळा पैसा बाहेर आला? याचे उत्तर सरकारने दिलेले नाही. जीएसटीबाबत अजूनही लोकांच्या मनात संभ्रम आहे, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.