विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी काव्यात्मक भाषेमध्ये मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशिष शेलारांना मंत्रिपदाची आस दाखवून कसे झुलवत ठेवले. शिवसेनेविरोधात त्यांचा कसा वापर करुन घेतला आणि आता शिवसेनेबरोबर युती झाल्यामुळे शेलारांना कसे जुळवून घ्यावे लागत आहे त्यावर टि्वटच्या माध्यमातून शाब्दीक बाण सोडले आहेत. प्रत्येक बाबतीत मुख्यमंत्र्यांनी शेलारांना फसवले आणि आता यांना यांच्यातलेच कवी ‘आठवले’ असे टि्वटमध्ये म्हटले आहे.

खरंतर लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेबरोबर युती होण्याआधी भाजपाकडून आशिष शेलार यांनीच शिवसेनेविरुद्ध मोर्चा संभाळला होता. शिवसेनेकडून भाजपावर होणाऱ्या टीकेचा आशिष शेलार आपल्या खास शैलीत समाचार घेत होते. पण आता युती झाल्यामुळे आशिष शेलारांनी शिवसेनेला दुखावणार कुठलही मतप्रदर्शन केलेलं नाही.

आज सकाळी त्यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली. शिवाजी पार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे असा टोला त्यांनी लगावला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात टीका केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ‘बारामतीचा पोपट’ असा त्यांचा उल्लेख केला होता. राज ठाकरेंची भाषणं बारामतीहून येतात अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तेव्हापासून मनसे आणि भाजपा नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे.