News Flash

जावयाच्या अटकेनंतर एकनाथ खडसेंना ईडीचं समन्स

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) समन्स बजावला आहे.

ED summons Eknath Khadse
खडसे यांना उद्या सकाळी ११ वाजता हजर राहण्यास सांगितले आहे

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) समन्स बजावला आहे. खडसे यांना उद्या सकाळी ११ वाजता हजर राहण्यास सांगितले आहे. यापुर्वी एकनाथ खडसे यांना ईडीने मोठा धक्का दिला आहे. एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने आज अटक केली. पुण्यातील भोसरी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी गिरीश चौधरी यांना ईडीकडून सोमवारी सकाळी चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. रात्री उशीरापर्यंत त्यांची चौकशी सुरु होती. यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. दरम्यान या पोठोपाठ एकनाथ खडसे यांना देखील ईडीने समन्स बजावला आहे.

याआधी ईडीकडून भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी जानेवारी महिन्यात एकनाथ खडसेंची चौकशी करण्यात आली होती. माजी भाजपा नेते असणारे एकनाथ खडसे यांना ईडीने डिसेंबर महिन्यातच चौकशीसाठी हजर होण्यासाठी समन्स बजावलं होतं. यानंतर एकनाख खडसे यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. आपण भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने ईडीकडून कारवाई केली जात असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी यावेळी केला होता.

भूखंड ३.७५ कोटींचा, पण मुद्रांक शुल्क ३१ कोटींवर..

ईडीने यावेळी एकनाथ खडसे अंमलबजावणी प्रकरण माहिती अहवालानुसार (ECIR) आरोपी नाहीत, मात्र जर त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत तर अटक केली जाऊ शकते असं स्पष्ट केलं होतं. २०१८ मध्ये २२ पानांच्या रिपोर्टमध्ये एसीबीने एकनाथ खडसेंनी क्लीन चीट दिली होती.

एकनाथ खडसे याआधी राज्याचे महसूल मंत्री होते. जमीन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती दिनकर जोतिंग यांच्या अध्यक्षतेखाली न्यायिक आयोग स्थापन करण्यात आली होता.

एकनाथ खडसेंना ईडीकडून मोठा धक्का; भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी जावयाला अटक

काय आहे प्रकरण?

खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व जावाई गिरीश चौधरी यांनी २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी एमआयडीसी येथील सव्‍‌र्हे क्र. ५२/२ अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीनमालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद केली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या व त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झाले.

एकनाथ खडसेंचं म्हणणं काय आहे

खडसे यांच्या म्हणण्यानुसार ‘‘मूळ जमीनमालकाने संपादित जमिनीचा मोबदला आधीपावेतो घेतला नसल्याने व भूसंपादन प्रक्रिया व्यपगत झाल्याने तोच आजही जमीनमालक आहे व तो ‘ती’ जमीन कुणालाही विकू शकतो. म्हणून आपणही त्याच्याकडून अशी जमीन घेऊ शकतो. त्यात बेकायदेशीर काही नाही’.

ईडी लावली तर मी सीडी लावेन

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतानाच आपल्यामागे ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, भाजपाने ईडी लावली तर आपण सीडी लावू, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला होता. मला एकदा जयंत पाटील यांनी विचारलं की तुम्ही राष्ट्रवादीत येणार का? तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही घेतलं तर येईन. तर त्यावेळी जयंत पाटील म्हणाले, तुम्ही आलात तर ते तुमच्यामागे ईडी लावतील, असं आमचे गमतीत बोलणं सुरु होतं. पण आता सांगतो जर त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावीन, असं खडसे यांनी म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2021 7:28 pm

Web Title: ncp leader eknath khadse was summoned by the ed srk 94
टॅग : Eknath Khadse
Next Stories
1 TRP Scam: रिपब्लिक टीव्हीच्या तीन कर्मचाऱ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर
2 मनसे आमदार राजू पाटील ईडी कार्यालयात; चर्चांना उधाण
3 करोना, ब्लॅक फंगस…अगदी अवयवही निकामी झाले, पण ‘हा’ पठ्ठ्या तरीही सुखरुप घरी परतला!
Just Now!
X