द हिंदू दैनिकाचे पत्रकार आलोक देशपांडे यांना धक्काबुक्की करणारे पोलीस उपनिरीक्षक धनंजय घनगे यांना तात्काळ निलंबित करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. विधानभवनाबाहेर ते पत्रकारांशी बोलत होते.

आलोक देशपांडे मंगळवारी आझाद मैदानात नाणार प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी आलोक देशपांडे यांना पोलीस उपनिरीक्षक धनंजय घनगे यांनी अत्यंत हीन दर्जाची वागणूक दिली. त्यांना मारहाण करण्यापर्यंत घनगेंची मजल गेली होती असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

हा वृत्तपत्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खून आहे असे आव्हाड म्हणाले. सरकारच्या आदेशावरुन पोलिसांनी असे करायचे ठरवले. आंदोलनकर्त्यांना भेटण्याचीही परवानगी मिळणार नसेल तर महाराष्ट्र कुठल्या दिशेने चाललाय ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सरकार हमसे डरती हैं, पोलिसको को आगे करती हैं  ही आम्ही घोषणा देतो त्यात काय चुकीचे आहे असे आव्हाड म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आम्ही  या घटनेचा निषेध करतो. ज्या उपनिरिक्षकाने हात उगारला त्याची सरकारने त्वरित बदली करावी, निलंबन करावे अशी मागणी आव्हाड यांनी केली.