राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेतली. आव्हाड हे सुमारे एक तास मातोश्रीवर होते. ‘काल उग्रलेख’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी आव्हाड हे मातोश्रीवर गेले होते. येत्या १८ नोव्हेंबर रोजी ठाण्यात या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

आव्हाड यांनी विविध विषयांवर लिहिलेल्या ब्लॉगचा या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. अक्षर प्रकाशन हे या पुस्तकाचे प्रकाशक आहेत. या पुस्तकाची प्रत देण्यासाठी व १८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी आव्हाड हे रविवारी ‘मातोश्री’वर गेले होते. सुमारे एक तास आव्हाड आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. आव्हाड यांनी ठाकरे यांना पुस्तकाची एक प्रतही दिली. पुस्तक प्रकाशनाच्या या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हेही उपस्थित राहणार आहेत.

यावेळी मिलिंद नार्वेकर आणि पक्षाचे काही नेते उपस्थित होते. आव्हाड यांनीच आगामी पुस्तक प्रकाशनासाठी ठाकरे यांची भेट घेतल्याचे स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शरद पवार यांनी एकाच विमानातून प्रवास केला होता. त्यावेळी राष्ट्रवादी आणि मनसे यांच्यातील जवळीकतेविषयी मोठी चर्चा झाली होती. त्यातच आव्हाड यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. परंतु, राजकीय वर्तुळात चर्चा रंगण्यापूर्वीच आव्हाड यांनी पुस्तक प्रकाशनासाठी सदिच्छा भेट दिल्याचे स्पष्ट केले.