सुजय विखे-पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर प्रथमच राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रथमच माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत नाराजी व्यक्त करत आघाडी धर्माबाबत वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतला आहे. ज्यांच्या मुलाने आघाडी सोडून भाजपात प्रवेश केला त्यांनी आघाडीबाबत बोलू नये, असा टोला त्यांनी लगावला आहे.

राजीव गांधींनी बाळासाहेब विखेंना पाडा, असा आदेश दिला होता. काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून ती जबाबदारी शरद पवारांनी पाळली होती, असे आव्हाड म्हणाले. तसेच गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला.

मुलगा, नातूच काय पणतू, खापर पणतू, सुना सगळ्यांनाच त्यांनी पळवावे. त्यामुळे इथली जागा तरी रिकामी होईल. यामुळे गरिबांच्या मुलांना संधी मिळेल. गरिबांची मुले विचारांची तलवार घेऊन फिरतील, अशा शब्दांत त्यांनी महाजन यांना प्रत्युत्तर दिले.

शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा वारसा चालवणार्‍यांचे अनेक नातू-पणतू वैचारिक आग ओकत आहेत. ७० वर्षांच्या काँग्रेसच्या राजवटीत गांधींचे विचार मांडणारे आजोबा, पणजोबा, यांच्या कार्यकर्तृत्वावर आयता ताव मारणारे तुप-लोणी खाऊन मदमस्त झालेले नातू-पणतू पळवणाऱ्यांना लखलाभ, असा ट्विट त्यांनी केले.