देशातील आर्थिक मंदीच्या मुद्यावरून काँग्रेसह विरोधकांकडून सरकारवर सातत्याने टीका होत आहे. सध्याच्या आर्थिक मंदीचा फटका केंद्र सरकारच्या ताब्यातील कंपन्यांनाही बसल्याचे दिसत आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल), शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एससीआय) यासह पाच मोठ्या सरकारी कंपन्यांचे खासगीकरण केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी सरकारवर तोफ डागली आहे.

”भारत पेट्रोलियम, शिपिंग कॉर्पोरेशनसह पाच सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. विरोधकांनी 70 वर्षात देश विकला असं किंकाळणाऱ्यांनी देश विकायला काढलाय! येणारी पुढची पिढी यांना कदापि माफ करणार नाही.” असा घणाघात आमदार धनंजय मुंडे यांनी सरकारवर केला आहे.

देशात मंदीसदृश वातावरण निर्माण होण्यास सध्याच्या सरकारच्या काळात विश्वास गमावल्याने उसवत गेलेला सामाजिक सलोखा हे प्रमुख कारण असल्याचे मत माजी पंतप्रधान व अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले आहे. अर्थव्यवस्था डबघाईस आली असून ती सुधारण्यासाठी मोदी सरकारने द्वेषमूलक पद्धतीचा त्याग केला पाहिजे, अशी सूचना देखील त्यांनी केली आहे.