मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीच्या तोंडावर धक्का बसला आहे. कारण राष्ट्रवादीचे सचिन अहिर हे आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सचिन अहिर यांनी स्वतःच प्रसारमाध्यमांना दिली आहे. अनेकदा कठोर निर्णय घ्यावे लागतात. मला शिवसेनेत जात असल्याचा आनंद होतो आहे. सकाळी ११ वाजता मातोश्री या ठिकाणी ते उपस्थित राहणार आहेत असेही त्यांनी सांगितले आहे. सचिन अहिर यांच्या या निर्णयामुळे मुंबईत राष्ट्रवादीला खिंडार पडलं आहे.  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शिवसेनेचे बळ वाढले आहे.

मी गेल्या आठवड्यात शरद पवार यांना फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांचे जे स्थान आहे ते माझ्या हृदयात कायम राहणार आहे. मात्र अनेकदा कठोर निर्णय घ्यावे लागतात असे अहिर यांनी म्हटले आहे. तसेच आदित्य ठाकरे यांच्या कामामुळे प्रभावित झालो आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

बुधवारी सचिन अहिर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. मला तुमची कायम साथ लाभली आहे अशीच साथ पुढे कायम ठेवा. यापुढे आपल्याला अधिक ताकदीने लढायचे आहे असे म्हणत सचिन अहिर यांनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केले. तसेच रात्रीच्या सुमारास त्यांच्या स्वीय सचिवांनी सगळ्या कार्यकर्त्यांना आज सकाळी अकरा वाजता मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थांनी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

या सगळ्या घडामोडींमुळे सचिन अहिर यांचा शिवसेना प्रवेश निश्चित आहे. सचिन अहिर हे राष्ट्रवादीचा मुंबईतील चेहरा मानला जात होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी  शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी तो मोठा धक्का मानला जातो आहे.  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अहिर यांना रोखण्यासाठी प्रयत्न केले होते मात्र ते अयशस्वी ठरले आहेत. सचिन अहिर हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार ही अफवा असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले होते. मात्र सचिन अहिर आता शिवसेनेत जाणार हे स्पष्ट झाले आहे.