मुंबई : कोणतेही सरकार नवे निर्णय घेते किंवा नवी धोरणे तयार करते. कालांतराने ही धोरणे कालबाह्य़ ठरतात. त्यामुळे या धोरणांचा दर पाच वर्षांनी आढावा घेऊन कालानुरूप बदल करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी आणि कोन’ या दूरसंवादमालेत सोमवारी केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६१व्या वर्धापन दिनानिमित्ताने येत्या दहा वर्षांतील राज्याचे राजकारण आणि समाजकारण कसे असेल, याचा वेध घेणाऱ्या ‘दृष्टी आणि कोन’ या ‘लोकसत्ता’च्या दूरसंवादमालेचा प्रारंभ सुप्रिया सुळे यांच्या संवादाने झाला. संसदेत प्रवेश करताना वडील शरद पवार यांनी दिलेला मोलाचा सल्ला, चुलतबंधू अजित पवार यांच्याबरोबरील संबंध, भाजपबद्दलचा बागुलबुवा, महाविकास आघाडीच्या सरकारची कामगिरी, राष्ट्रवादीचे भवितव्य आदी विषयांवर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कु बेर यांनी प्रास्ताविक केले.

शरद पवार हे मुख्यमंत्री असताना महिला धोरण राबविण्यात आले. त्या वेळी मोबाइल वगैरे नव्हते. तात्कालिक परिस्थितीनुसार धोरण तयार करण्यात आले होते. सध्याच्या युगात मोबाइल हा महत्त्वाचा घटक झाला आहे. मोबाइलच्या माध्यमातून महिलांची छळवणूक सुरू झाली. महिला सरपंच निवडून आल्यावर त्यांचे कौतुक के ले जाते. पण पाच वर्षांतील या सरपंचांच्या कामगिरीचे मूल्यमापन होत नाही. सरकारच्या पातळीवर निर्णय झाल्यावर त्याची प्रभावीपणे कितीअंमलबजावणी होते याचे मूल्यमापन करण्याची यंत्रणाच नाही. म्हणूनच दर पाच वर्षांनी सरकारी धोरणांचा फेरआढावा घेतला गेल्यास त्याचा किती फायदा झाला आणि काय बदल करायला पाहिजेत यावर प्रकाश टाकता येईल, असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

राज्यातील तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार किती टिकेल, अशी शंका सुरुवातीपासून उपस्थित केली जात होती. मात्र राष्ट्रीय पातळीवर महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीची दखल घेतली जाऊ लागली आहे. महाविकास आघाडी सरकारवर भाजपने टीका करायलाच हवी. लोकशाहीत विरोधकांचे ते कामच असते. पण ही टीका वैयक्तिक पातळीवर नसावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आपली ताकद वाढावी आणि मुख्यमंत्रिपद मिळावे, अशी प्रत्येक राजकीय पक्षाची इच्छा असते. त्यात गैर काहीही नाही. राष्ट्रवादीही भविष्यात वाढावा हे पक्षाच्या नेत्यांना वाटते. राष्ट्रवादी म्हणजे फक्त पवार कुटुंबीय नाही तर राष्ट्रवादी पक्ष हेच एक कुटुंब आहे, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘लोकसत्ता’च्या भक्ती बिसुरे यांनी केले.

राज ठाकरे यांच्याशी आज संवाद

‘दृष्टी आणि कोन’ या दूरसंवादमालेत आज (मंगळवार) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे भूमिका मांडतील. सायंकाळी ५ वाजता हा वेबसंवाद होईल.